Soil Testing : भारत हा शेतीप्रधान देश आहे. देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आजही उदरनिर्वाहासाठी शेती हा व्यवसाय केला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये देशात मोठ्या प्रमाणात शहरीकरण आणि औद्योगीकरण झाले आहे. ग्लोबलायझेशनच्या या युगात आपल्या देशाने वेगवेगळ्या क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली आहे.
शेतीमध्ये देखील देशाने चांगली कामगिरी केली आहे. आता देशातून विविध शेतीची उत्पादने मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाऊ लागली आहेत. भारत आता अख्या जगाचे पोट भरू पाहत आहे. तथापि आजही देशातील शेतकऱ्यांना शेतीमध्ये वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. तंत्रज्ञानात झालेली प्रगती निश्चितच वाखाण्याजोगी आहे.
मात्र आजही आपल्या देशातील शेतकऱ्यांना सर्वच सोयी सुविधा उपलब्ध आहेत असे नाही. मात्र अपुऱ्या संसाधनांमध्ये देखील आपल्या शेतकऱ्यांनी फारच उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे. खरे तर कोणत्याही पिकातून जर चांगले दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर माती परीक्षण करणे आवश्यक आहे.
सोईल टेस्टिंग केल्यामुळे जमिनीत कोणत्या पोषक घटकांची कमतरता आहे हे समजते. यानुसार मग पिकाच्या योग्य वाढीसाठी पोषक घटकांची पूर्तता केली जाते. पण सध्या स्थितीला देशात माती परीक्षण करणे खूपच किचकट आहे. यामुळे अनेक शेतकरी माहिती असूनही माती परीक्षण करत नाहीत.
माती परीक्षणाचे अद्भुत फायदे आहेत पण तरीही शेतकरी सोईल टेस्टिंगची प्रक्रिया खूपच वेळ खाऊ असल्याने सोईल टेस्टिंग न करता थेट पिकांची लागवड करतो. यामुळे मात्र शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो. दरम्यान शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन आयआयटी बॉम्बे येथे कार्यरत डॉ. राजुल पाटकर यांनी मातीचे आरोग्य तपासण्यासाठी अर्थातच माती परीक्षणासाठी एक विशेष यंत्र म्हणजे डिवाईस बनवले आहे.
यां मशीनला त्यांनी NutriSense असे नाव दिले आहे. हे यंत्र ६ पॅरामीटर्सवर मातीची चाचणी करते. तसेच, हे मशीन फक्त 5 मिनिटांतच माती परीक्षण पूर्ण करते आणि जमिनीच्या आरोग्याबाबत माहिती देते. पिकाच्या वाढीसाठी शेत जमिनीला कोणत्या खताची गरज आहे ? हे ओळखण्यासाठी माती परीक्षण केले जाते.
पण सध्या माती परीक्षण करण्यासाठी जवळपास पंधरा दिवसांचा वेळ लागतो. शिवाय माती परीक्षणाची प्रक्रिया खूपच किचकट आहे. पण, राजुर पाटकर यांनी विकसित केलेले हे नवीन यंत्र म्हणजेच न्यूट्री सेन्स अवघ्या 5 मिनिटात माती परीक्षण करते.
कसे काम करणार हे नवीन डिवाईस
राजूल पाटकर यांनी विकसित केलेले न्यूट्रिसेन्स हे मशीन अवघ्या काही मिनिटात माती परीक्षण करते. या मशीनद्वारे माती परीक्षण करण्यासाठी पहिल्यांदा मातीचा नमुना घ्यावा लागतो. केवळ एक ग्रॅम माती नमुन्यासाठी वापरली जाते. नमुना घेतल्यानंतर 3 मिली एजंट सोल्यूशन एका लहान कुपीमध्ये ओतले जाते.
मग ते मातीत मिसळले जाते. त्यानंतर मग माती घट्ट होण्यासाठी अर्धा तास तशीचं ठेवावी लागते. यानंतर, उपकरणाच्या सेन्सरवर द्रावणाचा एक थेंब टाकला जातो. हे उपकरण सर्व सहा मापदंडांसाठी मातीची चाचणी करण्यास सक्षम आहे.
या यंत्राच्या मदतीने सुमारे पाच मिनिटांत माती परीक्षणाचा निकाल समोर येतो आणि मृदा आरोग्य पत्रिका तयार होते. विशेष म्हणजे मातीची ही आरोग्य पत्रिका डाऊनलोड देखील करता येते. निश्चितच हे मशीन शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर ठरणार असून यामुळे माते परीक्षणासाठी लागणारा वेळ वाचणार आहे.