Soyabean Farming : सोयाबीन हे महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्वाचे नगदी पीक आहे. विशेष म्हणजे यंदा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने राज्यात सोयाबीन लागवड वाढू शकते. मान्सून आगमनासाठी आता फक्त बोटावर मोजण्या इतके दिवस शिल्लक राहिले आहेत.
अशा परिस्थितीत आता शेतकऱ्यांची आगामी खरीप हंगामासाठीची तयारी सुरू झाली आहे. दरम्यान जर तुम्हीही येत्या खरीप हंगामात सोयाबीन लागवडीच्या तयारीत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे.
कारण की आज आपण सोयाबीन पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी कोणत्या औषधांची बीजप्रक्रिया केली पाहिजे जेणेकरून त्यांना दर्जेदार उत्पादन मिळेल याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सोयाबीनवर कोणत्या औषधाने बीज प्रक्रिया करावी
सोयाबीनला पिवळं सोनं म्हणून ओळखलं जातं. यातून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन तर मिळतेच शिवाय तेलबिया पीक असल्याने बाजारात याला चांगला भावही मिळतो. पण, हवामानातील बदलामुळे सोयाबीन पिकावर कीटकांचा आणि रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येत आहे.
सोयाबीन पिकावर खोडमाशी, चक्रीभुंगा, पाने खाणारी अळी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, उंट आळी अशा विविध किडींचा प्रादुर्भाव सुद्धा पाहायला मिळतो.
खोडमाशी या कीटकामुळे तर सोयाबीन पिकाचे सर्वाधिक नुकसान होते. जर या कीटकांमुळे पिकाचे नुकसान होऊ नये असे वाटत असेल तर बीज प्रक्रिया हा महत्त्वाचा घटक राहणार आहे.
खोडमाशीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी प्रति किलो बियाण्याला रासायनिक कीटकनाशक थायोमेथॉग्झाम ३० टक्के एफएस १० मिली याप्रमाणात चोळून बीज प्रक्रिया करावी असा सल्ला देण्यात आला आहे.
कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या बीजप्रक्रियेमुळे सुरुवातीचे २५ ते ३० दिवस सोयाबीन पीक खोडमाशी या किडीच्या प्रादुर्भापासून मुक्त राहू शकत. एकंदरीत या रासायनिक कीटकनाशकांची बीज प्रक्रिया केल्यानंतर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टळू शकते.
कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे सोयाबीन बियाण्यावर बीज प्रक्रिया करताना सर्वप्रथम रासायनिक बुरशीनाशकाची, त्यानंतर रासायनिक कीटकनाशकाची व सर्वात शेवटी जैविक बुरशीनाशक व जैविक संवर्धनाची बीज प्रक्रिया केली पाहिजे.
अशा तऱ्हेने बीज प्रक्रिया केली तर सोयाबीन पिकातून चांगले उत्पादन मिळणार आहे शिवाय उत्पादनाचा खर्च देखील मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. या बीज प्रक्रियेमुळे कीटकांचा आणि रोगांचा धोका काहीसा कमी होण्याची आशा असते.