Soyabean Farming : सोयाबीन महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थानसहित देशात उत्पादित होणारे एक प्रमुख तेलबिया पीक आहे. या पिकाची भारतात मोठ्या प्रमाणात शेती होते. देशाच्या एकूण उत्पादनापैकी 45% उत्पादन मध्य प्रदेशात आणि 40% उत्पादन आपल्या महाराष्ट्रात होते.
याचाच अर्थ राज्यातील बहुतांशी शेतकरी या पिकावर अवलंबून आहेत. मात्र सध्या महाराष्ट्रातील सोयाबीन पिकावर येलो मोझॅक या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. राज्यातील यवतमाळ, वर्धा, हिंगोली समवेतच विविध प्रमुख सोयाबीन उत्पादक जिल्ह्यांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.
यावर्षी सोयाबीनची पेरणी जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झाली. याचाच अर्थ सोयाबीनचे पीक 90 ते 95 दिवसाचे झाले आहे. येत्या काही दिवसात सोयाबीनची हार्वेस्टिंग सुरू होणार आहे. ज्या ठिकाणी उशिराने पेरणी झाली आहे तेथे हार्वेस्टिंग उशिराने सुरू होणार आहे.
मात्र ऑक्टोबर महिन्यात त्या भागातही सोयाबीनची हार्वेस्टिंग सुरू होणार आहे. एकंदरीत सोयाबीनचे पीक आता अंतिम टप्प्यात आले आहे. अशातच मात्र सोयाबीन पिकावर येलो मोजक रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने उत्पादनात मोठी घट येण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे आज आपण सोयाबीन पिकावर आलेल्या या घातक रोगाचा कसा सामना केला पाहिजे याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं मिळवणार नियंत्रण ?
कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या रोगाची लक्षणे दिसताच क्षणी शेतकऱ्यांनी या रोगाच्या नियंत्रणासाठी ॲक्शन मोडमध्ये आले पाहिजे आणि योग्य त्या उपाययोजना केल्या पाहिजेत. शेतकऱ्यांनी या रोगाच्या नियंत्रणासाठी शेतातील रोगग्रस्त झाडे सुरुवातीची लक्षणे दिसताच क्षणी उपटून टाकावीत.
तसेच अशा प्रादुर्भावग्रस्त शेतात ठिकठिकाणी पिवळे चिकट सापळे लावावेत. सोबतच या रोगाचा प्रसार करणाऱ्या पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी शिफारस केलेले कीटकनाशक फवारावे. शेतकरी बांधव या पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी अॅसिटामिप्रिड २५% + बायफेन्थ्रीन २५% डब्ल्यूजी (२५० ग्रॅम/हेक्टर) याची फवारणी करू शकतात.
जर हे औषध उपलब्ध नसेल तर शेतकरी बांधव थायोमेथोक्सॅम + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन (१२५ मिली/हेक्टर) किंवा बीटासिफ्लुथ्रीन + इमिडाक्लोप्रिड (३५० मिली/हेक्टर) या कीटकनाशकांची फवारणी करू शकतात. तथापि फवारणी करण्यापूर्वी कृषी क्षेत्रातील तज्ञ लोकांचा तसेच कृषी सेवा केंद्र चालक यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. इथे दिलेली माहिती ही फक्त शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी आहे. या फवारणीमुळे सदर रोगावर नियंत्रण मिळतेच याबाबत आम्ही कोणताही दावा करत नाही.