Soyabean Lagwad : सोयाबीन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम उभ राहत ते मराठवाडा आणि विदर्भाचे चित्र. कारण की, मराठवाडा आणि विदर्भ विभागातील जवळपास सर्वच जिल्ह्यात सोयाबीनची कमी अधिक प्रमाणात लागवड पाहायला मिळते. मराठवाड्यातील सर्वच शेतकरी या मुख्य पिकावर अवलंबून आहेत. यंदा देखील मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली जाणार आहे.
अद्याप राज्यात कुठेच पेरणी योग्य पाऊस पाहायला मिळालेला नाही. यामुळे सोयाबीनची पेरणी राज्यात अजूनही सुरु झालेली नाही. परंतु पेरणी योग्य पाऊस झाला म्हणजे साधारणतः 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाला तर सोयाबीनची पेरणी सुरु होणार आहे. सोयाबीन हे पिक जरी शाश्वत उत्पादन देणारे असले तरी देखील अनेकदा सोयाबीन पिकात विविध कीटकांचा प्रादुर्भाव होतो आणि यामुळे उत्पादनात घट येते.
हवामानातील बदलामुळे सोयाबीन पिकावर कीटकांचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. सोयाबीनवर खोडमाशी, चक्रीभुंगा, पाने खाणारी अळी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, उंट आळी अशा विविध किडींचा प्रादुर्भाव होतो. यामध्ये मात्र खोडमाशी या कीटकामुळे सोयाबीन पिकाचे सर्वाधिक नुकसान होते.
यामुळे या किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अगदी पेरणीपासून काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. यामध्ये सोयाबीन बियाण्यावर बीजप्रक्रिया करणे देखील महत्त्वाची बाब ठरते. म्हणून या कीटकांचा प्रादुर्भाव पिकावर होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी कोणत्या औषधाने बीजप्रक्रिया केली पाहिजे याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
सोयाबीन पेरणी पूर्वी बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे. खोडमाशीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी प्रति किलो बियाण्याला रासायनिक कीटकनाशक थायोमेथॉग्झाम ३० टक्के एफएस १० मिली याप्रमाणात चोळून बीज उपचार करणे आवश्यक आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, या बीजप्रक्रियेमुळे सुरुवातीचे २५ ते ३० दिवस सोयाबीन पीक खोडमाशी या किडीच्या प्रादुर्भापासून मुक्त राहतं.
बीज प्रक्रिया करताना सर्वप्रथम रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी. त्यानंतर रासायनिक कीटकनाशकाची व सर्वात शेवटी जैविक बुरशीनाशक व जैविक संवर्धनाची बीज प्रक्रिया करावी. अशा प्रकारे बीजप्रक्रिया केल्यास सोयाबीनवर खोडमाशीचा प्रादुर्भाव टाळता येतो, असं मत काही तज्ज्ञांच्या माध्यमातून वर्तवण्यात आल आहे.