Soybean Farming : महाराष्ट्रात सोयाबीन या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या पिकाची राज्यातील मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात लागवड पाहायला मिळते. शासकीय आकडेवारीनुसार, देशातील एकूण सोयाबीन उत्पादनात महाराष्ट्र राज्याचा 45 टक्के एवढा वाटा आहे.
उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशात दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे तर मध्यप्रदेश या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो. एकूणच काय की, राज्यातील बहुतांशी शेतकरी या पिकावर अवलंबून आहेत. खरंतर राज्यात सोयाबीनच्या विविध वाणांची पेरणी केली जाते. विविध सोयाबीन वाणातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळत आहे.
पण गेल्या काही वर्षांपासून सोयाबीनची एकरी उत्पादकता थोडीशी कमी झाली आहे. येलो मोझॅक तसेच ईतर अन्य रोगामुळे आणि कीटकांमुळे सोयाबीनची उत्पादकता कमी झाल्याचे मत कृषी तज्ञांनी व्यक्त केले आहे. यंदा तर कमी पावसामुळे सोयाबीनचे उत्पादनात नेहमीच्या तुलनेत अधिक घट पाहायला मिळत आहे. यंदा जून महिन्यात मान्सूनचे उशिराने आगमन झाले.
जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला मात्र पुन्हा एकदा ऑगस्ट महिन्यात पावसाने उघडीप दिली होती. यामुळे बहुतांशी भागातील सोयाबीन पीक करपले. काही ठिकाणी ऑगस्ट महिन्यात झालेल्या कमी पावसामुळे वाढीच्या अवस्थेतील सोयाबीन पिकावर विपरीत परिणाम झाला आणि उत्पादनात घट आली. सप्टेंबर महिन्यात राज्यात चांगला पाऊस झाला, पण ऑगस्ट महिन्यातील पावसाची तूट यामुळे भरून निघाली नाही.
यंदा महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत तब्बल 12% कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे सोयाबीन समवेत संपूर्ण खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनात घट आली आहे. या अशा विपरीत परिस्थितीमध्ये मात्र राज्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने सोयाबीनच्या पिकातून एकरी 20 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळवून दाखवले आहे. यामुळे सध्या या प्रयोगशील शेतकऱ्याची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे.
मराठवाडा विभागातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील प्रगतशील शेतकरी राजकुमार सोमानी यांनी यंदा कमी पाऊस झालेला असतानाही सोयाबीन पिकातून हेक्टरी 39 क्विंटलचे उत्पादन मिळवले आहे. राजकुमार यांनी कृषी संजीवनीच्या शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या ओमकार या सोयाबीन वाणाच्या पेरणीतून हेक्टरी जवळपास 39 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळवून दाखवले आहे.
राजकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी ओमकार या जातीच्या सोयाबीनची बीबीएफ या तंत्रज्ञानावर पेरणी केली होती. पेरणीनंतर योग्य व्यवस्थापन केल्यामुळे त्यांना दोन एकरात 28 क्विंटलचे उत्पादन मिळाले आहे. दरम्यान, ओमकार या जातीपासून 39 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जात आहे. सोयाबीनच्या या नवीन वाणाची विशेषता म्हणजे ही जात गर्डल बीटल, लीफ मायनर, लीफ रोलर, स्टेम फ्लाय, ऍफिड्स, व्हाईट फ्लाय आणि डिफोलिएटर यांसारख्या धोकादायक कीटकांशी लढण्यासाठी सक्षम आहे.
यामुळे या वाणावर कीटकांचा प्रादुर्भाव होत नसल्याचे सांगितले जात आहे. ओमकार जातीचे सोयाबीन पेरणीनंतर 43 दिवसात फुलोरावस्थेत येते. तसेच या जातीचे पीक फक्त 104 दिवसात परिपक्व होते. या सोयाबीन वाणाच्या पेरणीसाठी एकरी 30 हजारापर्यंतचा खर्च येतो आणि जवळपास दोन लाखांपर्यंतचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळते.