Soybean Farming : सोयाबीन एक मुख्य तेलबिया पिक म्हणून ओळखले जाते. या पिकाची जगभरात लागवड केली जाते. ब्राझील, अर्जेंटिना, अमेरिका, पाकिस्तान ही सोयाबीन उत्पादनासाठी विशेष ओळखली जातात. भारतात देखील सोयाबीनचे उत्पादन खूपच अधिक आहे. देशातील एकूण उत्पादनापैकी जवळपास 40 ते 42 टक्के उत्पादन आपल्या महाराष्ट्रात घेतले जाते.
महाराष्ट्र हा सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत देशात दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. राज्यातील शेतकऱ्यांची सोयाबीन उत्पादकता ही प्रती हेक्टर तीस क्विंटल पर्यंत असल्याचा दावा केला जातो. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना प्रति हेक्टर दहा ते बारा क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते. साहजिकच शेतकऱ्यांना खूपच कमी उत्पादन सोयाबीन पिकातून मिळत आहे.
याचे प्रमुख कारण म्हणजे सोयाबीन पेरणी करताना शेतकऱ्यांच्या माध्यमातून काही छोट्या-मोठ्या चुका घडत असतात. या छोट्या-छोट्या चुका मात्र उत्पादनात घट घडवून आणतात. यामुळे आज आपण शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, कोणत्या वेळी शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली पाहिजे या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सोयाबीनची पेरणी वेळेवर करा
सोयाबीन पिकातून जर विक्रमी उत्पादन मिळवायचे असेल तर याची पेरणी वेळेवर करणे आवश्यक आहे. सोयाबीनची पेरणी ही जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापर्यंत केली जाऊ शकते. तज्ञ लोक सांगतात की, शेतकऱ्यांनी 26 जुलै नंतर सोयाबीनची पेरणी शक्यतो टाळावी. जर 26 जुलै पर्यंत चांगला पेरणीयोग्य पाऊस झाला नाही तर त्यानंतर सोयाबीन ऐवजी शेतकऱ्यांनी दुसऱ्या पिकांची लागवड करणे त्यांच्यासाठी फायदेशीर राहणार आहे. तसेच सोयाबीन पेरणीसाठी शेतकऱ्यांनी घाई करू नये आणि किमान 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी.
सोयाबीन पेरणी करताना बिजोप्रक्रिया करा
सोयाबीन पेरणी करण्यापूर्वी बियाण्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी बुरशीनाशकाची किंवा कीटकनाशकांची तज्ञांच्या सल्ल्याने बीज प्रक्रिया करून मगच पेरणी करावी जेणेकरून त्यांना चांगले उत्पादन मिळू शकेल.
या अंतरावर करा पेरणी
तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, योग्य अंतरावर बियाण्याची पेरणी केली तर चांगले उत्पादन मिळते. म्हणून सोयाबीनची पेरणी ४५ बाय ५ सें. मी. किंवा ७.५ सें. मी. अंतरावर पाभर किंवा ट्रॅक्टरचलित सीड ड्रिलच्या साहाय्यानेच शेतकऱ्यांनी केली पाहिजे. तसेच बियाणे पेरताना बियाणे अधिक खोल पेरू नये अन्यथा बियाण्याच्या उगवण क्षमतेवर परिणाम होतो. बियाणे हे २.५ ते ३.० सें. मी. खोलीपेक्षा जास्त खोल पेरु नये. यापेक्षा अधिक खोलीवर बियाणे पेरले तर बियाणे उगवण पावत नाहीत परिणामी उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण होते.
सोयाबीनच्या सुधारित वाणांची करा पेरणी
शेतकऱ्यांनी सोयाबीनचा सुधारित वाणांची निवड करून दर्जेदार बियाण्याची पेरणी केली पाहिजे. शेतकरी फुले किमया, फुले संगम, जे एस ३३५, जेएस ९३०५, एमएयुएस ७१, एमएयुएस ६१२ इ. जातीच्या सोयाबीन बियाण्यांची लागवड करू शकतात. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा पोत अर्थातच मगदूर पाहून आणि हवामान पाहून वाणाची निवड करणे आवश्यक आहे. सोयाबीन जातीची निवड करण्यापूर्वी शेतकरी बांधव तज्ञ लोकांचा सल्ला देखील घेऊ शकतात.