Soybean Market 2023 : यावर्षी पावसाचा लहरीपणा खरीप हंगामातील पिकांसाठी मोठा मारक ठरला आहे. जून आणि ऑगस्ट या दोन महिन्यात राज्यात पुरेसा पाऊस झाला नसल्याने सोयाबीन पीक देखील संकटात सापडले होते.
याचा परिणाम म्हणून सोयाबीनच्या उत्पादनात यंदा घट होणार असा दावा तज्ञांनी केला आहे. दरम्यान महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आगात सोयाबीन पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचा सोयाबीन काढणीसाठी तयार झाला आहे.
काही ठिकाणी सोयाबीनची हार्वेस्टिंग देखील पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे काही भागात नवीन सोयाबीन बाजारात दाखल झाले आहे. परंतु अजूनही बाजारात नव्या सोयाबीनची आवक खूपच कमी आहे.
विजयादशमीनंतर अर्थातच दसऱ्यानंतर नवीन सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढणार असा अंदाज आहे. दरम्यान, जालना जिल्ह्यात नवीन आणि जुन्या सोयाबीनला चार हजार ते साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळत आहे.
मात्र यावर्षी उत्पादनात घट होणार असा अंदाज असल्याने आगामी काळात बाजार भाव वाढू शकतात असे तज्ञांनी नमूद केले आहे. खरंतर, यावर्षी अमेरिका, ब्राझील या देशांमध्ये देखील कमी पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन घटणार असा अंदाज आहे.
याशिवाय भारतातही सोयाबीनचे उत्पादन विक्रमी कमी होणार आहे. अमेरिका, ब्राझील आणि भारत हे तीनही देश सोयाबीन उत्पादनासाठी विशेष ओळखले जातात. या तिन्ही देशांमध्ये सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
मात्र या प्रमुख सोयाबीन उत्पादक राष्ट्रांमध्ये सोयाबीनचे उत्पादन घटणार असा अंदाज आहे. यामुळे सोयाबीनचा बाजारात शॉर्टेज निर्माण होईल आणि मागणीच्या तुलनेत पुरवठा होणार नसल्याने बाजारभाव कडाडणार असे सांगितले जात आहे.
अशातच कृषी विभागाच्या पुणे येथील स्मार्ट प्रकल्पातील तज्ञांनी ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान सोयाबीन बाजाराची काय स्थिती राहील, सोयाबीनला काय भाव मिळू शकतो याबाबत एक अतिशय महत्त्वाचे भाकीत वर्तवले आहे.
स्मार्ट प्रकल्पातील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत लातूर बाजार समितीत सोयाबीनच्या किंमती ४७०० ते ५२०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहू शकतात.
हे भाव एफएक्यू कॉलीटीच्या ग्रेडच्या सोयाबीनला मिळणार आहे. देशात आयात केलेल्या सोयाबीन तेल आणि अमेरिकेतील सोयाबीन उत्पादनाचा अंदाज घेऊन तज्ञांनी भविष्यातील सोयाबीन बाजार भावाबाबत ही माहिती दिली आहे. तथापि तज्ञांनी वर्तवलेला हा अंदाज पूर्णपणे खरा ठरेलच असे नाही यामध्ये कमी जास्त देखील होऊ शकते.