Soybean Market Price : देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. ही बातमी देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अधिक खास राहणार आहे. कारण की यंदा सोयाबीनला चांगला विक्रमी भाव मिळण्याची शक्यता तज्ज्ञांच्या माध्यमातून वर्तवली जात आहे.
वास्तविक सोयाबीन हे एक नगदी पीक आहे. शाश्वत उत्पादन मिळत असल्याने या पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र खूपच अधिक आहे. हे एक प्रमुख तेलबिया पीक म्हणून ओळखले जाते. सोयाबीनला बाजारात चांगला भाव मिळतो यामुळे शेतकऱ्यांना यातून चांगली कमाई होण्याची आशा असते.
मात्र गत हंगामात सोयाबीनला शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे भाव मिळाला नाही. गेल्या हंगामात हमीभावापेक्षा अधिक भाव सोयाबीनला मिळाला पण सोयाबीन पीक उत्पादित करण्यासाठी आलेला खर्च पाहता गेल्या हंगामातील दर शेतकऱ्यांना परवडत नव्हते. यंदा मात्र सोयाबीनला गेल्या हंगामापेक्षा चांगला भाव मिळेल असे सांगितले जात आहे.
विक्रमी दर मिळण्याची कारणे ?
वास्तविक सोयाबीनचा नवीन हंगाम पुढल्या महिन्यापासून सुरू होण्याचे असे आहे. दरवर्षी ऑक्टोबर मध्ये नवीन हंगाम सुरू होतो. विजयादशमीच्या आसपास नवीन सोयाबीन बाजारात येते. यावर्षी पावसाला उशिराने सुरुवात झाली असल्याने राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी जुनच्या शेवटच्या आठवड्यात तर काही शेतकऱ्यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात सोयाबीन पेरणी केली आहे.
दरम्यान हे पीक ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यादरम्यान काढण्यासाठी येऊ शकते. तर काही शेतकऱ्यांचे पीक 10 ऑक्टोबरच्या सुमारास काढण्यासाठी तयार होणार आहे. एकंदरीत नवीन सोयाबीन ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात बाजारात विक्रीसाठी येऊ शकते. मात्र काढणी झाल्यानंतर लगेचच शेतकरी सोयाबीनची विक्री करणार नाहीत.
परंतु काही प्रमाणात नवीन सोयाबीन बाजारात दाखल होणार आहे. सध्या सोयाबीनला 5000 ते साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत आहे. मात्र प्रमुख सोयाबीन उत्पादक राष्ट्रांमध्ये सोयाबीनचे उत्पादन यंदा कमी होणार आहे. ब्राझील आणि अमेरिका हे दोन प्रमुख सोयाबीन उत्पादक राष्ट्र असून या देशांमध्ये उत्पादन खूपच कमी होणार असा दावा केला जात आहे.
तेथे देखील कमी पावसामुळे उत्पादनावर परिणाम होणार आहे. याशिवाय भारतातही यंदा सोयाबीनचे उत्पादन काहीसे कमी होईल अशी शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून जागतिक सोयाबीन उत्पादन घटण्याची भीती आहे. साहजिकच उत्पादनात घट आली म्हणजेच दरात उसळी येणार आहे. याशिवाय दरवाढीचे अन्य काही कारणे डेखील आहेत. उत्पादनात घट होणे हे दर वाढण्याचे मुख्य कारण ठरू शकते. याशिवाय अमेरिकेत सोयाबीनच्या दरात तेजी आली आहे.
तसेच पाम तेलाच्या बाजारभावात वाढ झाली आहे. यामुळे सोयातेलाच्या बाजार भावाला आधार मिळत आहे. यासोबतच सोयाबीन आणि सोयापेंड यांच्या वायदेबाजारात देखील तेजी आहे. याशिवाय सूर्यफूल तेलाचे दर तेजीत आले असून याचा देखील फायदा सोयाबीन तेलाला मिळणार आहे.
एकंदरीत जागतिक उत्पादनात येणारी घट आणि पामतेल, सूर्यफूल तेल यांच्या दरात झालेली वाढ आणि यामुळे वाढत असलेले सोयाबीन तेलाचे भाव तसेच सोयाबीनचे आणि सोयापेंडच्या वायदे बाजारात आलेली तेजी या सर्व पार्श्वभूमीवर सोयाबीनचे बाजार भाव यंदा विक्रमी वाढणार असल्याचा दावा केला जात आहे.
यामुळे आता सोयाबीन ट्रेडर्स कडून वर्तवण्यात आलेला हा अंदाज खरा ठरतो का आणि या नवीन हंगामात सोयाबीनला विक्रमी भाव मिळतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.