Soybean Market : महाराष्ट्रात यावर्षीच्या खरीपातील नवीन हंगामातील सोयाबीन बाजारात दाखल होऊ लागले आहे. लवकर पेरणी केलेले सोयाबीन सध्या काढण्यासाठी आले असून हेच सोयाबीन राज्यातील काही भागांमध्ये बाजारात देखील विक्रीसाठी येत आहे.
खरंतर सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. शाश्वतं उत्पादन आणि उत्पन्न मिळत असल्याने सोयाबीनला येलो गोल्ड म्हणून देखील ओळखले जाते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून सोयाबीनचे बाजार भाव खूपच दबावात आहेत. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत असल्याचे चित्र आहे.
सोयाबीन हे राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात उत्पादित होणारे एक मुख्य पीक आहे. दरम्यान मराठवाड्यातील हिंगोली एपीएमसी मध्ये नवीन सोयाबीन विक्रीसाठी येऊ लागले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार काल हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या खरीप हंगामातील नवीन सोयाबीनची आवक झाली होती.
काल या बाजारात 630 क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. कालच्या लिलावात सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ४३५० ते कमाल ४६०० रुपये तर सरासरी ४४७५ रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या मार्केटमध्ये शनिवारपासून नवीन सोयाबीनची आवक सुरू झाली असून.
30 सप्टेंबर अर्थातच शनिवारी सोयाबीनची ३६० क्विंटल आवक झाली होती आणि किमान ४५०५, कमाल ४७९१ रुपये आणि सरासरी ४६४८ रुपये प्रतिक्विंटल एवढा भाव मिळाला होता. अर्थातच नवीन सोयाबीन बाजारात आल्यानंतर बाजारभावात घसरणच होत आहे. सोयाबीनच्या सरासरी दरात 30 तारखेपासून ते आतापर्यंत दोनशे रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांची चिंता वाढत आहे.
मात्र असे असले तरी बाजार अभ्यासाकांनी अमेरिका, चीन, भारत, ब्राझील यांसारख्या प्रमुख सोयाबीन उत्पादक राष्ट्रांमध्ये सोयाबीनचे उत्पादन कमी होणाराचा अंदाज व्यक्त केला असून त्याचा परिणाम म्हणून आगामी काळात सोयाबीनच्या दरात वाढ होऊ शकते असे सांगितले जात आहे. त्यामुळे आता भविष्यात सोयाबीनला काय भाव मिळतो यावरच शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून राहणार असल्याचे चित्र आहे.