Soybean Price : सोयाबीन हे महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. सोयाबीनपासून शाश्वत उत्पन्न मिळत असल्याने या पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. याची लागवड राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ या विभागात मोठ्या प्रमाणात होत आहे. या विभागातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण याच नगदी पिकावर अवलंबून असते.
मात्र या हंगामात सोयाबीनला अपेक्षित असा दर मिळालेला नाही. यामुळे सोयाबीन उत्पादक अडचणीत सापडले आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात सोयाबीनला सहा हजारापर्यंतचा दर मिळत होता मात्र दरात घसरण झाली. आता सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून येत्या काही दिवसात नवीन हंगामातील सोयाबीन पिकाची पेरणी पूर्ण होणार आहे. राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून येत्या काही दिवसात मान्सूनची तीव्रता वाढणार आणि संपूर्ण राज्यभर मोसमी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत आगामी काही दिवसांत सोयाबीनची पेरणी सुरु होणार आहे. एकंदरीत आता 2022 चा सोयाबीन हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. अशातच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे गेल्या काही दिवसांपासून पाच हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी दरात विकला जाणारा सोयाबीन आता 5000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक दरात विकला जात आहे. यामुळे खरीप हंगामासाठी तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असे चित्र आहे.
खरंतर एप्रिल मे महिन्यामध्ये सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली होती. मात्र खरीप हंगामासाठी पैशांची निकड असल्याने शेतकऱ्यांनी दर कमी असतानाही सोयाबीनची विक्री केली. आता मात्र मागणीमध्ये वाढ झाली असून सोयाबीनच्या दराने 5000 चा टप्पा पार केला आहे. सोयाबीन दरात थोडीशी वाढ झाली असल्याने आवकही वाढली आहे.
सध्या महाराष्ट्रात 5250 रुपये प्रति क्विंटल पर्यंतच्या कमल बाजारभावात सोयाबीनची विक्री होत आहे. निश्चितच हा भाव शतकऱ्यांसाठी फायदेशीर नाहीये. या भावात सोयाबीनची विक्री केली तर पिकासाठी आलेला उत्पादन खर्च देखील भरून निघणार नाही असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. परंतु गेल्या काही दिवसांच्या तुलनेत दरात वाढ झाली असल्याने याचा शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.
खरंतर, महाराष्ट्रात सोयाबीन 5000 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास विक्री होत आहेत मात्र इतर राज्यात सोयाबीनचे बाजारभाव सात हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे. गुजरात, मध्यप्रदेश आणि राजस्थान मध्ये सोयाबीनचे बाजार भाव सात हजार रुपये प्रतिक्विंटलवर पोहचले आहेत. यामुळे सहाजिकच राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा हिरमोड होत आहे.
सोयाबीनला किती मिळतोय दर?
वाशिम एपीएमसीमध्ये सोयाबीनला 5000 चा दर मिळतोय. कारंजा एपीएमसी मध्ये सोयाबीन 5125 रुपये प्रति क्विंटल पर्यंत विकला गेलाय. मंगरूळपीर एफएमसी मध्ये सोयाबीन 5155 रुपये प्रति क्विंटल पर्यंत विकला गेला आहे. मनोरा आणि राजुरा एपीएमसी मध्ये सोयाबीन अनुक्रमे 5 हजार 50 आणि 5 हजार 60 रुपये प्रतिक्विंटल या भावात विकला गेला आहे.