Soybean Rate : सोयाबीन हे महाराष्ट्रातील मुख्य नगदी पिक आहे. या पिकाची राज्यात खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात या पिकाचे लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. खानदेशमध्ये देखील सोयाबीन पिकाची लागवड केली जाते. सध्या या प्रमुख तेलबिया पिकाची हार्वेस्टिंग युद्धपातळीवर सुरू आहे.
विशेष म्हणजे काही भागात नवीन सोयाबीन देखील बाजारात येऊ लागला आहे. पण नवीन माल बाजारात येताच बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. अवघ्या 15 दिवसांच्या काळात क्विंटलमागे तब्बल 600 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंता वाढली आहे.
नवीन हंगामाच्या ऐन सुरुवातीला बाजारभावात घसरण झाली असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळतं आहे. सोयाबीनच्या आगारात म्हणजेच अकोला जिल्ह्यात सोयाबीन मात्र चार हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा सरासरी दर मिळत आहे. या अशा कवडीमोल दरात पिकासाठी आलेला उत्पादन खर्च देखील भरून निघणार नाही असे मत शेतकरी व्यक्त करत आहेत.
शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी नैसर्गिक संकटामुळे उत्पादनात मोठी घट आली आहे. जून महिन्यात यावर्षी कमी पाऊस पडला यामुळे पेरणीला उशीर झाला. तसेच जुलै महिन्यातील अतिवृष्टी झाली आणि ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा पावसाचा खंड पडला. याशिवाय सोयाबीन पिकावर येलो मोजॅक आणि करपा रोगाचा देखील मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव पाहायला मिळाला होता.
याचा परिणाम म्हणून सोयाबीन पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. एकरी फक्त तीन ते चार क्विंटल उत्पादन मिळत आहे. काही शेतकऱ्यांना तर याही पेक्षा कमी उत्पादन मिळाले आहे. एकरी आठ ते दहा क्विंटल पर्यंतचे उत्पादन झाले पाहिजे होते तिथे फक्त दोन ते तीन क्विंटल उत्पादन मिळत असल्याने शेतकरी बांधव मोठ्या अडचणीत आले आहेत.
विशेष म्हणजे उत्पादनात विक्रमी घट झालीय तरीही बाजारभावात सातत्याने घसरण होत आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव दुहेरी कोंडीत सापडला असून अशीच परिस्थिती कायम राहिली तर सोयाबीन उत्पादक कर्जबाजारी होतील असे सांगितले जात आहे.
15 दिवसात 600 रुपयांची घसरण
पंधरा दिवसांपूर्वी अर्थातच 29 सप्टेंबर रोजी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची 2185 क्विंटल इतकी आवक झाली होती. त्यावेळी या मार्केटमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये एवढा सरासरी भाव मिळाला होता. दरम्यान काल या मार्केटमध्ये सोयाबीनला फक्त चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी भाव मिळाला आहे.
विशेष म्हणजे आवक देखील फक्त 1 हजार 70 क्विंटल एवढीच झाली होती. म्हणजे आवक कमी असतानाही सोयाबीनचे बाजार भाव कमी होत आहेत. त्यामुळे शेतकरी बांधव चिंतेत आले आहेत. यामुळे ज्यावेळी नवीन मालाची आवक मोठ्या प्रमाणात वाढेल त्यावेळी सोयाबीनला काय भाव मिळतो याकडे शेतकऱ्यांचे विशेष लक्ष लागून राहणार आहे. दरम्यान काही जाणकार लोकांनी आगामी काळात सोयाबीनचे बाजारभाव वाढू शकतात असा अंदाज व्यक्त केला आहे.