State Employee News : येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत. खऱ्या अर्थाने लोकशाहीचा महाकुंभ आता सजणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना खुश करण्यासाठी आता शासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न देखील केले जात असल्याचे गेल्या काही दिवसांच्या घटनाक्रमावरून आपले लक्षात आलेच असेल.
खरेतर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने नुकताच महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता.
मात्र आता यामध्ये चार टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या वित्त विभागाने याबाबतचा अधिकृत शासन निर्णय देखील जाहीर केला आहे. यानुसार जानेवारी 2024 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 50 टक्के एवढा महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे.
याचा लाभ मार्च महिन्याच्या वेतनासोबत अर्थातच एप्रिल महिन्यात जे वेतन हातात येईल त्या वेतनासोबत दिला जाणार आहे. म्हणजेच जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
दरम्यान, केंद्र शासनाने हा मोठा निर्णय घेतल्यानंतर आता राज्यातील शिंदे सरकार देखील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवणार असल्याची बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे याबाबतचा निर्णय आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच घेतला जाणार अशी शक्यता आहे.
केव्हा होणार निर्णय
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे सरकार 11 आणि 12 मार्चला अर्थातच येत्या सोमवारी आणि मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेत आहे. ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीच घेतले जात आहे.
यामुळे या बैठकीत राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय होतील अशी आशा आहे. राज्य कर्मचाऱ्यांना देखील वाढीव महागाई भत्ता लागू करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने महागाई भत्ता दिला जातोय. मात्र, आता यामध्ये शिंदे सरकार चार टक्क्यांची वाढ करू शकते.
म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील 50% एवढा होणार आहे. ही महागाई भत्ता वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार आहे.
यामुळे निश्चितच राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा या निमित्ताने व्यक्त होऊ लागली आहे. परिणामी, आता राज्य कर्मचाऱ्यांचे सारे लक्ष राज्य मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकांकडे असणार आहे.