State Employee News : काल अर्थात 30 जून 2023 रोजी राज्य कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट मिळाली आहे. वास्तविक, केंद्र शासनाने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी महिन्यापासून चार टक्के डीए वाढीचा निर्णय घेतला. यानंतर अनेक राज्य सरकारांच्या माध्यमातून तेथील कर्मचाऱ्यांसाठी डीए वाढ करण्यात आली.
म्हणून महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देखील शिंदे-फडणवीस सरकारने लवकरात लवकर महागाई भत्ता वाढ लागू करावी अशी मागणी होत होती. अशातच काल एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राज्य शासनाने महागाई भत्त्यात वाढ केली आहे. यासाठीचा शासन निर्णय देखील राज्य शासनाने काल निर्गमित केला आहे.
राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या माध्यमातून हा निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. यानुसार आता जानेवारी महिन्यापासून महागाई भत्त्यात म्हणजे DA मध्ये चार टक्के वाढ करण्यात आली आहे. आता राज्य कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. या आधी तो 38 टक्के एवढा होता.
विशेष बाब अशी की, हा लाभ रोखीने जून महिन्याच्या वेतनासोबत म्हणजेच जुलै महिन्यात जे वेतन मिळेल त्यासोबत दिला जाणार आहे. हा लाभ जानेवारी महिन्यापासून अनुज्ञयं राहणार असल्याने एक जानेवारी 2023 ते 31 मे 2023 पर्यंतची महागाई भत्ता थकबाकी देखील दिली जाणार आहे.
निश्चितच, राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांच्या हिताचा असून संबंधितांच्या माध्यमातून शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. अशातच नंदुरबार जिल्ह्यातील निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी देखील एक आनंदाची बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे या संबंधित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना जून महिन्याच्या निवृत्तीवेतनासोबत म्हणजेच जुलै महिन्यात जें निवृत्तीवेतन मिळेल त्यासोबत सातवा वेतन आयोग फरकाचा चौथा हप्ता दिला जाणार आहे.
याची माहिती नुकत्याच काही दिवसांपूर्वी जिल्हा कोषागार अधिकारी भिमराव महाले यांनी जिल्हा कोषागार कार्यालयात आयोजित निवृत्ती वेतन धारकांच्या मेळाव्यात दिली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारक लोकांसाठी हा देखील निर्णय आर्थिक फायद्याचा सिद्ध होणार आहे.