State Employee News : पुढल्या वर्षी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. तसेच राज्यात विधानसभा निवडणूका देखील राहणार आहेत. यामुळे आता महाराष्ट्रासह संपूर्ण देशात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासन स्तरावर वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत.
निवडणुकीचा आगामी कार्यक्रम पाहता जनतेला नाराज करून चालणार नाही म्हणून विविध विकास कामांना मूर्त रूप देण्याचे काम शासनाकडून सुरू आहे. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना देखील खुश करण्यासाठी केंद्र शासनाकडून आणि राज्य शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान राज्य शासन आता लवकरच राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना एक मोठी भेट देणार असल्याचे सांगितले जात आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, झेडपी शिक्षकांचे सातवा वेतन आयोगाच्या थकबाकीच्या चार हप्त्यांचे, वैद्यकीय देयके, रजा, प्रवास व इतर सवलतींचे तब्बल 3 हजार 604 कोटी 38 लाख 70 हजार रुपये शासनाकडे थकीत आहेत.
यामुळे ही रक्कम लवकरात लवकर मिळावी यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. दरम्यान यासाठी शिक्षण संचालनालयाने पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणी सादर केली आहे. यामुळे आता या पुरवण्या मागण्यांवर शासनाकडून सकारात्मक निर्णय घेतला जातो का आणि ही थकीत रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांना वर्ग केली जाते का? हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या वेतनासाठी 21 हजार 487 कोटी 43 लाख 3000 रुपयांची तरतूद केली आहे. मात्र वेतनाशिवाय शिक्षकांची वैद्यकीय बिले, रजा प्रवास सवलत, इतर सवलतीसाठी आणि सातवा वेतन आयोगाच्या थकबाकीचा पहिला दुसरा तिसरा आणि चौथा हप्ता देण्यासाठी कोणतीच तरतूद अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलेली नाही.
विशेष बाब अशी की शासकीय सेवेत कार्यरत असलेले इतर विभागातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचे चारही हप्ते मिळाले आहेत. काही विभागातील कर्मचाऱ्यांना पाचवा हप्ता देण्यासाठी पत्र निर्गमित करण्यात आले आहे. मात्र जिल्हा परिषद शाळेतील हजारो शिक्षकांना हा थकीत रकमेचा पहिला हप्ता देखील मिळालेला नाही.
काही शिक्षकांना सातवा वेतन आयोगाचा पहिला हप्ता मिळालेला आहे. दरम्यान हा थकीत लाभ लवकरात लवकर संबंधितांना मिळावा यासाठी आता शासनाकडे मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासन देखील यावर सकारात्मक निर्णय घेऊ शकते असे मत काही तज्ञ व्यक्त करत आहेत.