Sugarcane Crop Management : गेल्या काही वर्षांपासून हवामानात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे प्रमुख बागायती पीक समजले जाणारे उसाचे पीक शेतकऱ्यांसाठी डोईजड ठरत आहे. या पिकावर गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वेगवेगळ्या रोगांचा आणि कीटकांचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.
यामुळे हे नगदी पीक शेतकऱ्यांना परवडत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान यावर्षी देखील ऊस पिकावर विविध रोगांचा आणि कीटकांचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. सध्याच्या वातावरणामुळे ऊस पिकात हुमणी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे.
या अळीवर जर वेळेत नियंत्रण मिळवले नाही तर मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट येण्याची भीती आता व्यक्त होऊ लागली आहे. एक तर आधीच पावसाच्या लहरीपणामुळे ऊस पिक संकटात आले आहे. ऑगस्ट महिन्यात समाधानकारक असा पाऊस झाला नसल्याने राज्यातील प्रमुख ऊस उत्पादक पट्ट्यांमध्ये उसाची वाढ खुंटलेली आहे.
यामुळे उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी होण्याची भीती आहे. दरम्यान आता उसात हुमणी अळीचा प्रादुर्भाव पाहायला मिळत असल्याने उत्पादनात आणखी घट होईल असे सांगितले जात आहे. म्हणून आज आपण ऊस पिकासाठी घातक ठरत असलेल्या हुमणी अळीवर कसे नियंत्रण मिळवायचे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे ही अळी जमिनीत राहून पिकाची मुळे कुरतडते. यामुळे झाडे सुरुवातीच्या टप्प्यात पिवळे पडतात आणि नंतर मग सुकून जातात. साहजिकच ही अळी पिकाचे उत्पादन घटवते. यामुळे या अळीच्या नियंत्रणासाठी कृषी तज्ञांनी शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
काय उपाययोजना केल्या पाहिजेत
हुमणीच्या प्रभावी नियंत्रणासाठी ऊस पिकात आंतरमशागत केली पाहिजे. यामध्ये निंदणी आणि कोळपणीची कामे केली पाहिजेत. असे केल्याने ही अळी जमिनीतून वर येते. वर आलेली अळी उन्हाने मरण पावते तसेच जमिनीबाहेर आलेल्या अळ्या पक्षी वेचून खातात. आंतरमशागती सोबतच उस पिकाला फ्लड पाणी भरले पाहिजे. ऊस पिकाला वाहते पाणी देऊन काही काळ शेतातच पाणी साठवले पाहिजे. असे केल्याने पिकातील अळ्या गुदमरून मरतात.
या अळीच्या नियंत्रणासाठी रासायनिक औषधांचा देखील वापर केला जातो. यासाठी शेणखत देताना मेटाऱ्हायझिम ऍनिसोप्लि या जैविक बुरशीचा वापर केला जाऊ शकतो. ही बुरशी ऊस पिकासाठी घातक ठरत नाही मात्र हुमणीअळीसाठी घातक ठरते.
विशेष म्हणजे ही जैविक बुरशी उसाच्या उभ्या पिकातही दिली जाऊ शकते. उभ्या पिकात प्रति हेक्टर 10 किलो मेटाऱ्हायझिम ऍनिसोप्लि या जैविक बुरशीचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. कृषी तज्ञ सांगतात की या जैविक बुरशीमुळे हुमणी अळी रोगाने ग्रसित होतात आणि मरण पावतात.