Sugarcane Farming : ऊस हे राज्यात उत्पादित होणारे एक प्रमुख बागायती पीक आहे. या पिकाची शेती राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होते. याशिवाय मराठवाड्यात देखील या पिकाचे लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील इतरही भागात कमी अधिक प्रमाणात ऊस पिकाची लागवड केली जाते.
अशा स्थितीत आज आपण राज्यातील शेतकऱ्यांसाठी आडसाली उसाला कोणती खते दिली पाहिजेत याविषयी महत्त्वाची अशी माहिती घेऊन हजर झालो आहोत. कृषी तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार आडसाली उसाचा कालावधी हा 17 ते 18 महिने असतो. मात्र खोडव्याचे उत्पादन घेतले तर हे ते तीन वर्षांपर्यंत एका जमिनीत राहते.
कृषी तज्ञांनी आडसाली उसासाठी प्रतिहेक्टरी ४०० किलो नत्र, १७० किलो स्फुरद व १७० किलो पालाश या प्रमाणात रासायनिक खतांची मात्रा देण्याचा सल्ला दिला आहे. पण ही खतमात्रा माती परीक्षणानुसार दिली पाहिजे असं त्यांनी यावेळी नमूद केले आहे. दरम्यान को ८६०३२ या मध्यम उशिरा पक्व होणाऱ्या जातीची लागवड केली असल्यास खतांची मात्रा वाढवावी लागते.
याचे कारण म्हणजे या जातीसाठी अन्नद्रव्यांची गरज जास्त असते. यामुळे या जातीची जर लागवड केली असेल तर शेतकऱ्यांनी नत्र, स्फुरद आणि पालाशयुक्त खतांची २५ टक्के जास्त मात्रा दिली पाहिजे. या जातीसाठी ५०० किलो नत्र, २०० किलो स्फुरद आणि २०० किलो पालाश प्रतिहेक्टरी वापरण्याचा सल्ला यावेळी कृषी तज्ञांनी दिला आहे.
दरम्यान ही खत मात्रा देतांना नत्र खताची मात्रा चार हप्त्यात विभागून द्यावी असे देखील कृषी तज्ञांनी सांगितले आहे. तसेच जमीन हलकी असेल तर नत्र पाच-सहा वेळा विभागून द्यावे लागणार आहे. कृषी तज्ञ सांगतात की, आडसाली ऊसासाठी १० टक्के नत्र, स्फुरद व पालाश प्रत्येकी ५० टक्के लागवडीपूर्वी द्यावे.
नंतर लागवडीनंतर ६ ते ८ आठवड्यांनी नत्राचा ४० टक्केचा दुसरा हप्ता व १२ ते १४ आठवड्यांनी ऊस कांड्यांवर आल्यानंतर नत्राचा १० टक्के तिसरा हप्ता जमिनीतुन दिला पाहीजे. मोठ्या बांधणीच्या वेळी नत्राचा शेवटचा ४० टक्के हप्ता, स्फुरद व पालाशचा प्रत्येकी ५० टक्के दुसरा हप्ता दिला पाहिजे असे तज्ञांनी सांगितले आहे.
तसेच लागणीनंतर ४ ते ५ महिन्यांपर्यंत रासायनिक खतांचे सर्व हप्ते पूर्ण केले पाहिजेत असे केल्यास उसाचे उत्पादन वाढते. मोठ्या बांधणीनंतर रासायनिक खते देण्याची गरज नसते यामुळे मोठ्या बांधणी नंतर रासायनिक खत ऊसाला देऊ नये.