Surat Chennai Greenfield Expressway : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात गेल्या काही वर्षांमध्ये विविध महामार्गांची कामे पूर्णत्वास गेली आहेत. आपल्या राज्यात अनेक महामार्गाची कामे सध्या स्थितीला सुरु आहेत. काही महामार्गांचे कामे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून केली जात आहेत तर काही महामार्गांची कामे राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू आहेत. केंद्र शासनाने प्रस्तावित केलेले महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून विकसित होत आहेत.
यामध्ये सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्गाचा देखील समावेश होतो. हा महामार्ग राज्यातील अहमदनगर, नाशिक आणि सोलापूर या 3 जिल्ह्यांमधून जाणार आहे. सध्या स्थितीला या महामार्गासाठी महाराष्ट्रात भूसंपादनाचे काम सुरू आहे. अशातच मात्र या महामार्ग संदर्भात एक मोठी शॉकिंग बातमी समोर आली आहे. एकीकडे संपूर्ण देशभरात आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली आहे तर दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या महामार्गाचे काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
यामुळे या महामार्गामध्ये जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांचा जीव पुन्हा एकदा टांगणीला लागला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून या महामार्गाचे काम पुढील आदेश येईपर्यंत थांबवण्याचे आदेश देण्यात आले असून याबाबतचे पत्र जिल्हा प्रशासनांना नुकतेच प्राप्त झाले आहेत.
यामुळे या महामार्ग प्रकल्पाचे काम बारगळणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे. खरेतर सध्या आचारसंहिता सुरू असल्याने या संदर्भात शासन स्तरावर आता कोणताच धोरणात्मक निर्णय घेतला जाऊ शकत नाही. यामुळे जेव्हा आचारसंहिता निघेल, निवडणुकीचा निकाल लागेल आणि जेव्हा नवीन सरकार सत्तेत येईल तेव्हाच याबाबतचा धोरणात्मक निर्णय होईल अशी शक्यता व्यक्त होत आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या महामार्गासाठी सुरुवातीला नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास विरोध दाखवला होता. इतरही 2 जिल्ह्यात अशीच परिस्थिती होती. आता मात्र नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या मार्गासाठी जमिनी देण्यास सहमती दाखवली आहे. संबंधित बाधित शेतकरी प्रशासनाकडे येऊन किती मोबदला मिळणार याबाबत विचारणा देखील करत आहेत.
अशातच आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या महामार्गाचे काम पुढील आदेश येईपर्यंत थांबवण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यामुळे संबंधित बाधित शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असून नागरिकांच्या माध्यमातून हा महामार्ग प्रकल्प पण बारगळणार का असा सवाल उपस्थित होत आहे.
कसा आहे प्रकल्प ?
सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग भारतमाला परियोजनाअंतर्गत विकसित होत असलेला एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या महामार्गाची लांबी 1271 किलोमीटर एवढी आहे. हा महामार्ग राज्यातील नाशिक, अहमदनगर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांमधून जात आहे.
या महामार्गाचे काम सुरत ते सोलापूर आणि सोलापूर ते चेन्नई अशा दोन टप्प्यात केले जाणार आहे. या महामार्ग प्रकल्पामुळे नाशिक ते सुरत हा प्रवास फक्त पावणे दोन तासात पूर्ण होण्याची शक्यता आहे. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र व तमिळनाडू या 6 राज्यांना हा महामार्ग जोडणार आहे.
नाशिक जिल्ह्यात 122 किमीची लांबी
सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्ग नाशिक जिल्ह्यातून जातो. या महामार्गाची जिल्ह्यातील लांबी 122 किलोमीटर एवढी आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाला 996 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. सुरगाणा, पेठ, दिंडोरी, निफाड, नाशिक, सिन्नर या 6 तालुक्यांमधून हा महामार्ग जाणार असून सदर तालुक्यामधील खाजगी क्षेत्राची मोजणी जवळपास पूर्ण झालेली होती.
विशेष म्हणजे संपादनासाठी आवश्यक असलेला निधी त्या-त्या तालुक्यांकडे वर्ग करण्यात आलेला होता. यामुळे या महामार्गासाठी आवश्यक असलेले भूसंपादन लवकरच होईल आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी शक्यता व्यक्त होत होती. अशातच मात्रा आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुढील आदेश येईपर्यंत या महामार्गाचे काम थांबवलेले आहे.