Talathi Bharati Maharashtra : गेल्या अनेक दिवसांपासून तलाठी भरती बाबत महाराष्ट्रात मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. जसं की आपणास ठाऊकच आहे की नुकताच या भरतीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे येत्या आठवड्याभरात तलाठी भरतीची अंतिम निवड यादी प्रसिद्ध होणार आहे.
यादी प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याचा प्रयत्न राज्य शासनाच्या माध्यमातून केला जाणार आहे.
26 जानेवारी 2024 पर्यंत तलाठी भरतीत नियुक्त होणाऱ्यांना नियुक्तीपत्र दिले जाईल असे बोलले जात आहे. अशातच, मात्र तलाठी भरती परीक्षा वादाच्या भोवऱ्यात अडकत असल्याचे पाहायला मिळत आहे.
आधीपासूनच तलाठी भरती परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप विरोधकांच्या माध्यमातून केला जात आहे. अशातच आता नुकताच जाहीर झालेला तलाठी भरतीचा निकाल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
कारण की या निकालात प्रथम क्रमांक पटकावलेल्या मुलीला दोनशे पैकी चक्क 214 गुण मिळाले आहेत. यामुळे आता विरोधकांच्या माध्यमातून राज्य शासनावर गंभीर आरोप होऊ लागले आहेत.
दरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी तलाठी भरती परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप लगावला आहे.
विशेष म्हणजे या प्रकरणाची विशेष तपास पथकाच्या माध्यमातून तपासणी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे विधान दिले आहे.
फडणवीस यांनी याप्रकरणी वडेट्टीवार यांनी पुरावे सादर करावेत, ते मिळाल्यास परीक्षा रद्द करू असे जाहीर केले आहे. काल 7 जानेवारी देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील नवीन भाजप कार्यालयाला भेट दिली होती.
यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस यांना तलाठी भरती परीक्षेत गैरव्यवहार झाल्याच्या आरोपावर प्रश्न विचारला असता त्यांनी राज्यात तलाठी भरती परीक्षा ही अतिशय पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली असल्याचे सांगितले.
तसेच या परीक्षेत कोणताही गैरव्यवहार झाल्याचा पुरावा कोणीही दिल्यास त्याची चौकशी केली जाईल अन पुरावे योग्य असल्यास चौकशी करून ही परीक्षा रद्द केली जाईल आणि दोषींवर कारवाईही केली जाईल असे महत्त्वाचे विधान केले आहे.