Bhendwal Ghatmandni : दरवर्षीप्रमाणे यंदाही जगप्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी जाहीर करण्यात आली आहे. विदर्भातील सुमारे साडेतीन शतकांपासून सुरू असलेली ही भाकणुकीची परंपरा यंदाही कायम राहिली आहे.
जवळपास साडेतीनशे वर्षांपासून भेंडवळची घटमांडणी केली जात आहे. वऱ्हाडातील बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ गावात अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर होणारी ही घटमांडणी संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर देखील खूपच प्रसिद्ध आहे.
भेंडवळ गावात होणाऱ्या या घटमांडणीला भेंडवळची भाकणूक म्हणून ओळखले जाते. या घटमांडणीच्या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकरी बांधव हजेरी लावतात. शेतकरीच नाही तर शेतमजूर, बी-बियाण्या कंपन्या सुद्धा या घटमांडणीला आवर्जून उपस्थित राहतात. या घटमांडणीत वर्तवली जाणारी भाकणूक ही विशेष लोकप्रिय आहे.
शेतकऱ्यांच्या मते या घटमांडणीत जी भाकणूक वर्तवली जाते ती तंतोतंत खरी ठरते आणि यामुळेच शेतकरी बांधव या घट मांडणी कडे मोठ्या बारकाईने लक्ष ठेवून असतात. या भाकणुकीत काय अंदाज वर्तवला जातो याकडे साऱ्यांचेच लक्ष असते.
दरम्यान यंदाही या घट मांडणीतील भाकणूक वर्तवण्यात आली असून यामध्ये यंदाचा पावसाळा कसा राहणार, पिक पाणी कसे राहणार? याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.
आज सकाळी सहा वाजता भेंडवळ मध्ये घटमांडणी करण्यात आली. चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांच्या हस्ते ही घट मांडणी करण्यात आली. यानंतर भाकणूक वर्तवण्यात आली आहे.
कसा राहणार पावसाळा?
यंदा पावसाळा चांगला राहणार अशी आशा या भाकणुकीत वर्तवली गेली आहे. यंदा मान्सूनच्या पहिल्या महिन्यात अर्थातच जून महिन्यात कमी पाऊस बरसणार, दुसऱ्या महिन्यात म्हणजेच जुलै महिन्यात सर्वसाधारण पाऊस पडणार, तिसऱ्या महिन्यात अर्थातच ऑगस्ट महिन्यात पावसाची तीव्रता वाढणार आणि भरपूर पाऊस होणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे मान्सूनच्या चौथ्या महिन्यात अर्थातच सप्टेंबर महिन्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस होणार अशी शक्यता असल्याचे या घटमांडणीत स्पष्ट करण्यात आले आहे. यंदा कपाशी पिक सर्वसाधारण राहणार असं भाकित येथे सांगण्यात आलं आहे.
पिक पाणी कसे राहणार
यंदा ज्वारी, बाजरी, जवस, वाटाणा, तूर, मूग आणि उडीद सर्वसाधारण राहणार आहे. पण, यंदा तिळीपासून चांगले उत्पादन मिळणार. साळीचं पिक चांगल येणार. तसेच यावर्षी रोगराईचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता या भाकणुकीत वर्तवण्यात आली आहे.
यंदाचा रब्बी हंगाम मात्र शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता यामध्ये सांगितले गेले असून रब्बी हंगामामध्ये गहू आणि हरभऱ्याचे चांगल्या प्रमाणात उत्पादन मिळणार आहे. परंतु हरभरा बाजारभाव निश्चित राहणार नाहीत असे यामध्ये म्हटले गेले आहे. दुसरीकडे यावर्षी आचारसंहिता सुरू असल्याने राजकारणासंदर्भात कोणतीच भविष्यवाणी झालेली नाही.