India’s First CNG Bike : भारतातील टू व्हीलर सेगमेंट मध्ये आता सीएनजी बाईकची एन्ट्री होणार आहे. लवकरच भारतात पहिली सीएनजी बाईक लॉन्च होणार असे वृत्त आता झळकू लागले आहे. मीडिया रिपोर्ट नुसार बजाज ऑटो ही देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी सीएनजी मोटारसायकल लाँच करणार आहे.
शाश्वत मोबिलिटीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून कंपनीकडून सीएनजी बाईक लॉन्च केली जाणार आहे. बजाज आपल्या मोटरसायकलच्या पोर्टफोलिओमध्ये सीएनजी बाईकचा समावेश करणार आहे. त्यामुळे कंपनीचा पोर्टफोलिओ आणखी मजबूत होईल अशी आशा आहे.
यामुळे कंपनीच्या ग्राहक संख्येत वाढ होईल तसेच ग्राहकांना देखील सीएनजी बाईकमुळे पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किमतींपासून दिलासा मिळणार आहे.
केव्हा लाँच होणार बजाजची सीएनजी बाईक?
मिळालेल्या माहितीनुसार, ही बाईक ग्राहकांसाठी लवकरात लवकर लॉन्च होऊ शकते. आगामी आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल 2024 पासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात ही CNG बाईक ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली जाईल असा दावा प्रसारमाध्यमांमध्ये करण्यात आला आहे. बजाज ऑटोचे कार्यकारी संचालक राकेश शर्मा म्हणाले की, पुढील आर्थिक वर्षात राबविण्यात येणारे हे पाऊल कंपनीसाठी धोरणात्मक बदल दर्शवणार आहे.
बजाजच्या सीएनजी थ्री व्हीलरला मिळालेले यश पाहून सीएनजी मोटरसायकल आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुचाकी वाहनांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध करून देण्याबरोबरच संपूर्ण विद्युतीकरणाकडे वाटचाल करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
किंमत किती राहणार ?
या गाडीची किंमत किती राहणार हे अजूनही स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र या गाडीची कॉस्ट ही पेट्रोल गाडींपेक्षा अधिक राहणार आहे. म्हणजेच ग्राहकांना यासाठी अधिकचा पैसा मोजावा लागणार आहे. दरम्यान कंपनीच्या माध्यमातून सीएनजी बाईकवर जीएसटी कपात झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे.
जर जीएसटी मध्ये कपात झाली तर ही सीएनजी बाईक ग्राहकांना स्वस्तात उपलब्ध होऊ शकणार आहे. तथापि, बजाज कंपनी कोणती बाईक सीएनजी वेरियंटमध्ये लॉन्च करणार, या बाईकचे फीचर्स कसे राहणार याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही.