Milk Village :- भारत हा कृषीप्रधान देश असून संपूर्ण देशामध्ये शेतीसोबत पशुपालन व्यवसाय हा मोठ्या प्रमाणावर केला जातो. पशुपालन व्यवसायामध्ये प्रामुख्याने गाय व म्हशींचे पालन मोठ्या प्रमाणावर केले जाते व या माध्यमातून दुधाचे उत्पादन हा शेतकऱ्यांचा आर्थिक उत्पन्नाचा प्रमुख कणा असतो. जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये देखील गेल्या काही वर्षापासून शेतकरी दूध व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणावर वळले असून
अनेक प्रकारच्या संकरित गाईंचे पालन करून मोठ्या प्रमाणावर दूध उत्पादन मिळवण्यात यशस्वी झालेले आहेत. याच अनुषंगाने जर आपण महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील बोरगडी या गावाचा विचार केला तर हे गाव दूध व्यवसायाच्या बाबतीत सध्या खूप चर्चेत असून प्रत्येक कुटुंब दुधाचा व्यवसाय करून खूप चांगल्या प्रकारे नफा मिळवत आहेत. याच बोरगडी गावाविषयी आपण या लेखांमध्ये माहिती घेणार आहोत.
नांदेड जिल्ह्यातील बोरगडी हे गाव आहे दुधाचे गाव
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, नांदेड जिल्ह्यातील बोरगडी हे गाव सध्या खूप चर्चेत असून या पूर्ण गावामध्ये दुधाचा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो व या ठिकाणचे शेतकरी दूध व्यवसायाच्या माध्यमातून लाखोत कमाई करत आहेत. जर आपण बोरगडी या गावच्या दूध व्यवसायाची सुरुवात पाहिली तर साधारणपणे वीस वर्षांपूर्वी या गावचे शेतकरी हनुमंत गोपूवाड त्यांनी एक म्हैस खरेदी केली होती व दुधाचा व्यवसाय सुरू केला होता.
याच पद्धतीने हळूहळू संपूर्ण गावांमध्ये दूध व्यवसायाची क्रेझ निर्माण झाली व संपूर्ण गाव दूध व्यवसायाकडे वळले. या गावात दुधाचा व्यवसाय सुरू करणारे हनमंतु गोपूवाड यांच्याकडे आज दहा म्हशी असून त्यापैकी सहा म्हशी दूध देतात. सहा म्हशीच्या माध्यमातून सकाळ आणि संध्याकाळचे दोन वेळा पन्नास लिटर दुधाचे उत्पादन ते घेतात. साठ रुपये प्रति लिटर इतका दुधाला दर मिळत असून बोरगडी या गावाजवळील हिमायतनगर शहरामध्ये नेऊन ते दुधाची विक्री करतात व या माध्यमातून प्रत्येक दिवसाला 2500 ते 3000 रुपये पर्यंत उत्पन्न ते मिळवतात.
या आकडेवारीच्या साह्याने जर आपण पाहिले तर संपूर्ण खर्च वजा जाता त्यांना प्रत्येक महिन्याला सुमारे एक लाख रुपयांचा नफा मिळतो. हनमंतु गोपूवाड यांनी या व्यवसायाच्या माध्यमातून पाच एकर जमीन देखील विकत घेतली आहे व प्रत्येक शेतकऱ्याने आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत गाई पालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू केलेला आहे. हनुमंतु गोपूवाड हे दुसऱ्याच्या शेतामध्ये राखणीचे काम करत होते व गावामध्ये म्हैस घेऊन सर्वप्रथम दुधाचा व्यवसाय सुरू केला.
त्यांच्यापासून प्रेरणा घेत गावातील इतर शेतकऱ्यांनी देखील हा व्यवसाय सुरू केला व या व्यवसायातील नफा पाहून आता अनेक तरुण शेतकरी देखील या व्यवसायाकडे वळले आहेत. एका शेतकऱ्याच्या पावलावर पाऊल ठेवत सरकारी अनुदानाची मदत घेत इतर शेतकरी देखील आता गाय व म्हशींचे पालन करत असून नाबार्डच्या माध्यमातून अनुदान मिळवत मोठ्या प्रमाणावर या गावांमध्ये आता पशुपालन व्यवसाय केला जात आहे. तसे पाहायला गेले तर या गावचे संपूर्ण आर्थिक गणित दुधाच्या व्यवसायावर आता अवलंबून आहे.