Tomato Farming : टोमॅटो हे एक प्रमुख फळभाजी पीक आहे. या पिकाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेती पाहायला मिळते. विशेष म्हणजे टोमॅटोची मागणी पाहता याची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते.
गेल्या दोन-तीन महिन्यांपूर्वी तर बाजारात टोमॅटोला खूपच विक्रमी भाव मिळत होता. त्यावेळी शेतकऱ्यांना अक्षरशा करोडो रुपयांची कमाई टोमॅटोच्या पिकातून झाली.
यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना चांगला नफा मिळाला. मात्र असे असले तरी टोमॅटो पीक उत्पादित करताना शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा टोमॅटो फुटतात.
दरम्यान आज आपण टोमॅटो फळ फुटण्याचे नेमके कारण काय असते आणि असे झाल्यास त्यावर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवले जाऊ शकते याविषयी डिटेल माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, टोमॅटो फळे फुटण्याची अनेक कारणे आहेत. अनेकदा अनियमित व असंघटित सिंचनामुळे सुद्धा फळे तडकतात. किमान आणि कमाल तापमानात जास्त चढ-उतारांमुळे सुद्धा फळे तडकतात.
यामुळे टोमॅटो फळे तडकू नये यासाठी शेतात पालापाचोळा पसरवला पाहिजे म्हणजे पाला पाचोळ्याची मल्चिंग केली पाहिजे जेणेकरून टोमॅटो पिकातील फळे फुटणे टाळता येणार आहे.
पिकाला जास्त नायट्रोजन आणि कमी पोटॅश दिल्यानेही फळाला तडे जाऊ शकतात. यामुळे तुमच्या शेतात पुरेशी सेंद्रिय पदार्थ असल्याची खात्री करा ज्यामुळे वनस्पतींना घटक शोषण्यास मदत होते.
तसेच संतुलित खतांचा वापर करा. जर तुम्ही जास्त चुना किंवा हलक्या चिकणमाती असलेल्या जमिनीत टोमॅटोची लागवड केली असेल, तर अशा जमिनीत सहसा बोरॉन नावाच्या घटकाची कमतरता असते.
त्यामुळे सुद्धा फळे फुटू लागतात. म्हणजेच बोरॉनची कमतरता झाल्यास टोमॅटोची फळे फुटतात असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
अशा स्थितीत बोरॉनचा पुरवठा करण्यासाठी ०.३ ते ०.४ टक्के बोरॅक्स द्रावणाची फवारणी केली पाहिजे असा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे. पण प्रत्यारोपणाच्या 4 आठवड्यांनंतर याची फवारणी करावी, असे केल्यास अधिक फायदे मिळतात.