Tur Rate Maharashtra : सध्या बाजारात कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर आणि तुरीच्या दरात मोठी तेजी आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. खरंतर, यावर्षी सोयाबीन आणि कापसाला खूपच कवडीमोल दर मिळाला.
आता नवीन हंगामात सोयाबीन आणि कापसाचे लागवड पूर्ण झाली आहे तरीही सोयाबीन आणि कापसाला अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. तर दुसरीकडे तुर उत्पादक शेतकऱ्यांना विक्रमी बाजारभावामुळे थोडासा दिलासा मिळत आहे.
वास्तविक, गेल्या खरीप हंगामामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे तुर पिकाला मोठा फटका बसला होता. पावसाच्या या लहरीपणामुळे तुर पिकावर विविध रोगांचे आणि कीटकांचे सावट होते.
कीटकांच्या आणि रोगांच्या आक्रमणामुळे तुर पिकातून अपेक्षित असे उत्पादन मिळाले नाही. उत्पादनात झालेली मोठी घट आणि बाजारात वाढलेली मागणी या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून तुरीच्या दरात मात्र तेजी आली आहे.
सध्या राज्यातील प्रमुख बाजारात तुरीला दहा हजारापर्यंतचा दर मिळत आहे. पण याचा बोटावर मोजण्या इतक्याच शेतकऱ्यांना फायदा होत असून तुरीचे अपेक्षित असे उत्पादन मिळालेले नसल्याने वाढीव दराचा बहुसंख्य शेतकऱ्यांना फायदा होत नसल्याचे शेतकऱ्यांनी नमूद केले आहे.
कोणत्या बाजारात मिळतोय तुरीला विक्रमीं दर?
पुणे जिल्ह्यातील हवेलीच्या मार्केटमध्ये तुरीला दहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा विक्रमी भाव मिळाला आहे. याव्यतिरिक्त बारामती एपीएमसी मध्ये 9 हजार, इंदापूर एपीएमसी मध्ये 9500 आणि दौंड एपीएमसी मध्ये 9700 प्रतिक्विंटल एवढा भाव नमूद करण्यात आला आहे. राज्यातील इतरही बाजारात तुरीच्या दरात मोठी तेजी पाहायला मिळत आहे.
शेतकऱ्यांना फायदाच नाही
तूर उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, यावर्षी अवकाळी पावसाने आणि अतिवृष्टीमुळे तुरीच्या पिकाला मोठा फटका बसला. खराब हवामानामुळे तुर पिकावर वेगवेगळ्या कीटकांचे आणि रोगांचे सावट होते. परिणामी एकरी सव्वा क्विंटल ते दीड क्विंटल पर्यंतचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळाले आहे.
अशा परिस्थितीत तुरीला चांगला भाव मिळत असला तरी देखील या वाढीव दराचा फायदा शेतकऱ्यांना होत नाहीये. या दरातूनही पिकासाठी केलेला उत्पादन खर्च शेतकऱ्यांना भरून काढता येत नसल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे. एकंदरीत बाजारात तुरीला विक्रमी भाव मिळत असला तरी देखील याचा फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याचे सांगितले जात आहे.
तुरीचे दर तेजीतच राहणार
उत्पादन कमी झाले असल्याने सध्या बाजारात तुरीचे बाजारभाव विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. यामुळे तुरीच्या डाळीने 140 रुपये प्रति किलोचा टप्पा गाठला आहे. विशेष बाब म्हणजे नवीन हंगामातील तूर बाजारात येण्यास आणखी बराच काळ वाव आहे.
यामुळे आता जोपर्यंत नवीन तूर बाजारात येत नाही तोपर्यंत तुरीच्या दरात तेजी राहू शकते असं मत व्यक्त होत आहे. किमान पुढील दोन महिने तरी तुरीचे बाजार भाव तेजीतच राहतील अशी शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.