Tur Variety : राज्यात खरीप हंगामामध्ये सोयाबीन, कापूस या नगदी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश विभागात या दोन्ही पिकांची शेती केली जाते. याव्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातही सोयाबीन आणि कापूस लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. सोयाबीन, कापूस या नगदी पिकाबरोबरच राज्यात तूर लागवडीखालील क्षेत्र देखील विशेष उल्लेखनीय आहे.
या पिकाची राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश विभागात देखील कमी अधिक प्रमाणात लागवड पाहायला मिळते. या चारही विभागात तूर लागवडीखालील क्षेत्र उल्लेखनीय असून या पिकाची सलग किंवा आंतरपीक पद्धतीने शेती केली जाते.
इतर कोणत्याही पिकाच्या लागवडीतून अधिकचे उत्पादन मिळवण्यासाठी ज्याप्रमाणे त्या पिकाच्या सुधारित वाणाची लागवड करण्याचा सल्ला दिला जातो त्याचप्रमाणे तुरीच्या पिकातूनही विक्रमी उत्पादन मिळवण्यासाठी याच्या सुधारित वाणाची लागवड करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.
अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी तुरीच्या एका विशेष जातीची माहिती घेऊन हजर झालो आहोत. आज आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या विद्यापीठाने विकसित केलेल्या तुरीच्या फुले राजेश्वरी या वाणाची माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
फुले राजेश्वरी वाणाच्या विशेषता
हा वाण महाराष्ट्रासाठी शिफारशीत करण्यात आला आहे. राज्यात या जातीच्या तुर पिकाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. विशेषतः अहमदनगर, सोलापूर आणि नासिक या जिल्ह्यात या वाणाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे. विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या वाणाची पेरणी केल्यानंतर साधारणता 150 दिवसात पीक तयार होते.
या जातीचे तुर पिक मर आणि वांझ रोगास प्रतिकारक आहे. या जातीच्या तुर पिकाचे दाणे मध्यम आणि लाल रंगाचे असतात. यामुळे बाजारात या जातीच्या वाणाला मोठी मागणी आहे. तुरीच्या या वाणापासून शेतकऱ्यांना 12 ते 14 क्विंटल प्रति एकरपर्यंतचे उत्पादन मिळू शकते असा दावा केला जातो.
निश्चितच, इतर नगदी पिकांप्रमाणेच या तुरीच्या जातीतूपासूनही शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळणार आहेत. विशेष बाब म्हणजे या वाणाची पेरणी करताना एकरी एक किलोचे बियाणे पुरेसे ठरते. म्हणजेच या जातीपासून कमी उत्पादन खर्चात अधिकचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळवता येणे शक्य आहे.