Vande Bharat Express : महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राच्या शिरेपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. देशात लवकरच पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरु होणार आहे. विशेष म्हणजे ही गाडी महाराष्ट्रातुन धावणार आहे.
राजधानी मुंबई ते दिल्ली दरम्यान ही गाडी सुरू केली जाणार असल्याची माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. खरंतर सध्या देशात वंदे भारत एक्सप्रेस ही सर्वाधिक लोकप्रिय ट्रेन म्हणून ओळखली जात आहे. या गाडीला रेल्वे प्रवाशांनी भरभरून असा प्रतिसाद दिला आहे.
यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात मोठी भरीव वाढ झाली असून आता देशातील रेल्वे प्रवाशांना या ट्रेनने जलद गतीने आणि आरामदायी असा प्रवास अनुभवता येत आहे. दरम्यान रेल्वे प्रवाशांची पसंती पाहता ही गाडी देशातील सर्वच महत्त्वाचा मार्गावर चालवण्यासाठी शासनाने आणि रेल्वे प्रशासनाने कंबर कसली आहे.
सध्या स्थितीला ही गाडी देशातील एकूण 25 मार्गावर धावत आहे. मात्र आगामी काही दिवसात आणखी 40 मार्गावर ही गाडी चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मात्र आता 16 डब्ब्यांची गाडी न चालवता आठ डब्यांची मिनी वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय झाला आहे.
यासोबतच वंदे भारत स्लीपर ट्रेन देखील चालवली जाणार आहे. याच्या प्रोटोटाईपचे काम सध्या चेन्नई येथील फॅक्टरी मध्ये सुरू आहे. तसेच दिल्ली ते मुंबई दरम्यान मिशन रफ्तार हा प्रकल्प राबवला जात आहे.
या अंतर्गत मुंबई ते दिल्ली रेल्वे मार्गावर ट्रॅकचे मजबुतीकरण, पुलांचे सक्षमीकरण, OEHचे आधुनिकीकरण, संपूर्ण मार्गावर कवच यंत्रणा बसवणे, ट्रॅकच्या दोन्ही बाजूला कुंपण घालणे आदी कामे करण्यात येत आहेत. हे काम यंदाच्या आर्थिक वर्षा अखेर पूर्ण होणार असे सांगितले जात आहे.
हे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर 160 किलोमीटर प्रतितास या वेगाने रेल्वे धावण्यास सक्षम बनणार आहेत. हे मिशन रफ्तार चे काम 2017-18 मध्ये सुरू करण्यात आले होते आता हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते दिल्ली हा रेल्वे मार्गाचा सोळा तासांचा प्रवास अवघा बारा तासांवर येणार आहे.
अशातच हे काम पूर्ण झाल्यानंतर या रेल्वे मार्गावर देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवली जाऊ शकते अशी बातमी समोर आली आहे. यामुळे निश्चितच मुंबई ते दिल्लीचा हा प्रवास गतिमान होणार असून महाराष्ट्र पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचा मानकरी ठरणार आहे. निश्चितच, असे झाल्यास या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.