Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची हायस्पीड ट्रेन आहे. या गाडीची सुरुवात 2019 मध्ये झाली आहे. सर्वप्रथम ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर सुरू झाली. यानंतर मग टप्प्याटप्प्याने देशातील इतरही महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले आहे. आत्तापर्यंत 51 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सूरु झाली आहे. विशेष म्हणजे आगामी काळात इतरही महत्त्वाचा मार्गावर या गाडीला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.
महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर आतापर्यंत राज्याला 8 वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे. राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते साईनगर शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएममटी ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, नागपूर ते बिलासपुर आणि इंदोर ते नागपूर या मार्गावर ही गाडी सुरू आहे.
ज्या मार्गांवर वंदे भारत ट्रेन चालवली जात आहे तेथील प्रवाशांचा प्रवास हा आधीच्या तुलनेत सुपरफास्ट झाला आहे. यामुळे प्रवाशांच्या माध्यमातून वंदे भारत एक्सप्रेसला चांगला प्रतिसाद दाखवला जातोय.
हेच कारण आहे की रेल्वेच्या माध्यमातून वंदे भारत एक्सप्रेस च्या धर्तीवर वंदे भारत स्लीपर ट्रेन आणि वंदे भारत मेट्रो ट्रेन देखील चालवल्या जाणार आहेत. दरम्यान वंदे मेट्रो संदर्भात नुकतीच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
खरे तर वंदे भारत स्लीपर ट्रेनसाठी पुढल्या महिन्यात ट्रायल रन सुरू होणार आहे. ट्रायल रन पूर्ण झाल्यानंतर जुलै 2024 मध्ये वंदे भारत स्लीपर ट्रेन रुळावर धावण्याची शक्यता आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेननंतर आता वंदे मेट्रो देखील लवकरच रुळावर धावणार आहे.
स्लीपर ट्रेन एक हजार किलोमीटरहून अधिक अंतराच्या मार्गांवर धावतील, तर वंदे मेट्रो ट्रेन्स इंटरसिटी ट्रेनच्या धर्तीवर 100-250 किलोमीटरच्या मार्गावर धावणार आहेत. या गाड्या दोन प्रमुख शहरांना जोडणार आहेत.
विशेष म्हणजे या गाड्या कोणत्या मार्गावर धावू शकतात या संदर्भात देखील माहिती समोर आली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वंदे मेट्रो ट्रेन सुमारे 124 शहरांना जोडेल.
लखनऊ-कानपूर, आग्रा-मथुरा, दिल्ली-रेवाडी, भुवनेश्वर-बालासोर आणि तिरुपती-चेन्नई याशिवाय बिहारमधील भागलपूर आणि पश्चिम बंगालमधील हावडा दरम्यान वंदे मेट्रो चालवली जाणार अशी बातमी हाती आली आहे.
केव्हा सुरु होणार वंदे मेट्रो ट्रेन
मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर पहिली वंदे मेट्रो ट्रेन मे महिन्यापर्यंत तयार होणार आहे आणि जुलैपासून तिची ट्रायल रन सुरू होण्याची शक्यता आहे. ही पूर्णपणे वातानुकूलित म्हणजे एसी वंदे मेट्रो ताशी 130 किलोमीटर वेगाने प्रवास करू शकणार आहे.
याच्या प्रत्येक कोचमध्ये 280 लोक प्रवास करू शकतात, ज्यामध्ये 100 लोक बसण्याची व्यवस्था असेल, तर 180 लोक उभे राहून प्रवास करू शकतील.