Vande Bharat Express : संपूर्ण भारतीय बनावटीच्या वंदे भारत एक्सप्रेस या हाय स्पीड ट्रेन संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. खरे तर या हायस्पीड ट्रेनची लोकप्रियता गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही गाडी सर्वप्रथम 2019 मध्ये सुरू झाली होती.
म्हणजेच या ट्रेनचे संचालन सुरू होऊन आता पाच वर्षांचा काळ पूर्ण झाला आहे. या पाच वर्षांच्या काळातच भारतात 82 वंदे भारत ट्रेन सुरू झाल्या आहेत. म्हणजे भारतातील 41 महत्त्वाच्या अप आणि डाऊन मार्गांवर या गाड्या सुरू आहेत.
विशेष म्हणजे 2024 अखेरपर्यंत 60 नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा सरकारचा मानस असल्याचे बोलले जात आहे. अशातच आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लखनऊ ते देहरादून दरम्यान लवकरच वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. ही गाडी लखनऊ येथील गोमतीनगर रेल्वे स्थानकावरून धावणार अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.
यामुळे या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना निश्चितच वेगवान प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. या दोन्ही शहरादरम्यान आता जलद गतीने प्रवास करता येईल अशी आशा व्यक्त होत आहे.
विशेष बाब अशी की, याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे बोर्डाने या प्रस्तावाला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर या मार्गावर ही हायस्पीड ट्रेन सुरू होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
डिसेंबर 2023 मध्ये सहा नवीन वंदे भारत एक्सप्रेस चालवल्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अयोध्येतून सहा वंदे भारत ट्रेन सुरू केल्या आहेत. या गाड्या आहेत श्री माता वैष्णोदेवी कटरा-नवी दिल्ली वंदे भारत, अमृतसर-दिल्ली जंक्शन वंदे भारत एक्सप्रेस, कोईम्बतूर-बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस, जालना-मुंबई वंदे भारत, अयोध्या-आनंद विहार आणि मंगळुरू-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस.
या वर्षीही भारतीय रेल्वे अनेक नवीन वंदे भारत ट्रेन सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी मार्ग निश्चित केले जात आहेत. या वर्षी 60 नवीन वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची रेल्वेची योजना आहे.
मंगळुरू-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस मुंबई पर्यंत
मंगळूरु ते मडगाव वंदे भारत एक्सप्रेस राजधानी मुंबई पर्यंत चालवली गेली पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा केला जात आहे. लोकप्रतिनिधींनी ही मागणी लावून धरली आहे.
यामुळे जर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतला तर लवकरच मुंबईला आणखी एक नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे.