Vande Bharat Express : पुणे आणि नागपूरकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे या दोन्ही शहरांना लवकरच वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. पुणे राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून विश्वविख्यात.
तर नागपूर ही राज्याची उपराजधानी आणि हिवाळी अधिवेशनाचे केंद्र. ही दोन्ही शहरे महाराष्ट्रासाठी अति महत्त्वाची आहेत. केवळ महाराष्ट्राच नाही तर ही दोन्ही शहरे सबंध भारतासाठी महत्त्वाची आहेत. दरम्यान या दोन्ही शहरांचे महत्त्व ओळखून आता भारतीय रेल्वेच्या माध्यमातून पुणे आणि नागपूरला वंदे भारत एक्सप्रेसची भेट दिली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून थेट वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. सध्या पुण्याला मुंबई-सोलापूर या वंदे भारत एक्सप्रेसचा फायदा मिळत आहे. मात्र पुणे रेल्वे स्थानकावरून अजून कोणत्याही शहरात थेट वंदे भारत एक्सप्रेस सुरू झालेली नाही.
यामुळे पुणे रेल्वे स्टेशनवरून ही हाय स्पीड ट्रेन चालवण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न केले जात आहेत. आता पुणे रेल्वे स्टेशन ते सिकंदराबाद रेल्वे स्टेशन दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे. वास्तविक, या मार्गावर शताब्दी एक्सप्रेस सध्या सुरू आहे.
मात्र या एक्सप्रेसची जागा आता वंदे भारत एक्सप्रेस घेणार आहे. लवकरच पुणे ते सिकंदराबाद दरम्यान ही हायस्पीड ट्रेन सुरू होणार आहे. विशेष म्हणजे ही गाडी सोलापूर मार्गे धावणार असून यामुळे पुणे आणि सोलापूरकरांचा फायदा होणार आहे.
या गाडीमुळे पुणे वासियांचा सोलापूर, हैदराबाद कडील प्रवास सोयीचा होणार आहे. तसेच सोलापूरवासियांचा पुणेकडील आणि हैदराबादकडील प्रवास सोयीचा होणार आहे. या गाडीमुळे सोलापूरला ही दुसरी हाय स्पीड ट्रेन मिळणार आहे.
नागपूरलाही मिळणार वंदे भारत एक्सप्रेसची सौगात
नागपूरला या आधीच वंदे भारत ट्रेनची भेट मिळाली आहे. नागपूर ते बिलासपुर या मार्गावर ही ट्रेन सुरू आहे. दरम्यान नागपूरला आणखी एक वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असून ही गाडी नागपूर ते सिकंदराबाद दरम्यान चालवली जाणार आहे.
या गाडीला या रेल्वे मार्गावरील सर्व महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मिळणार आहे. यात काजीपेट, रामागुंडम, मनचेरियल, सिरपूर कागजनगर आणि बलारशाह या ठिकाणी थांबा भारतीय रेल्वेच्या माध्यमातून दिला जाऊ शकतो असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.