Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची देशातील पहिली हायस्पीड ट्रेन म्हणून ओळखली जाते. या गाडीची लोकप्रियता एवढी अधिक आहे की, वेगवेगळ्या मार्गांवर ही गाडी सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. या गाडीमुळे प्रवाशांचा प्रवास आधीच्या तुलनेत अधिक जलद आणि आरामदायी झाला आहे.
दरम्यान याच हाय स्पीड ट्रेन बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.ती म्हणजे देशातील आणखी दोन महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू होणार आहे. सध्या देशातील 41 महत्त्वाच्या मार्गांवर या प्रकारच्या गाड्या धावत आहेत. यापैकी सात मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत.
अशातच आता बिहारची राजधानी पटना जंक्शन येथून दोन नवीन वंदे भारत ट्रेन सुरू होणार असे वृत्त समोर आले आहे. पटना-अयोध्या-लखनऊ आणि पटना ते सिलिगुडी या मार्गावर ही गाडी सुरू होऊ शकते असे सांगितले जात आहे.
पटना-सिलिगुडी वंदे भारत एक्सप्रेस
पटना-सिलीगुडी वंदे भारतचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही गाडी सिलिगुडी येथून सकाळी सहा वाजता पटनाकडे रवाना होईल आणि पटनाला दुपारी एक वाजता पोहोचेल.
परतीच्या प्रवासात ही गाडी दुपारी तीन वाजता पटना जंक्शन येथून रवाना होईल आणि रात्री 22:00 ला ही गाडी सिलिगुडी येथे पोहोचणार आहे. 471 किलोमीटरचा हा प्रवास ही गाडी सात तासात पूर्ण करणार आहे.
पटना-अयोध्या-लखनऊ वंदे भारत एक्सप्रेस
पटना-अयोध्या-लखनऊ वंदे भारत ट्रेनचा नवा रेक शनिवारीच पोहोचला आहे. ही गाडी राजेंद्र नगर कोचिंग कॉम्प्लेक्समध्ये ठेवण्यात आली आहे. रविवारपासून या ट्रेनची ट्रायल रन आणि इतर चाचणीचे काम सुरू होणार आहे.
ही ट्रेन पाटणा-आरा-बक्सर-डीडीयू-अयोध्या मार्गे लखनऊपर्यंत धावेल. ही ट्रेन सकाळी 6 च्या सुमारास पटना जंक्शन येथून सुटणार आहे आणि लखनौ येथून रात्री 10.30 ला परतणार आहे.
पुढील आठवड्यापासून दोन्ही गाड्या धावण्याची शक्यता आहे. याची अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र मीडिया रिपोर्ट मध्ये असा दावा होत आहे.
महाराष्ट्रालाही मिळणार नवीन वंदे भारत
सध्या राज्यातून मुंबई ते गांधीनगर, मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते जालना, मुंबई ते गोवा, नागपूर ते बिलासपुर आणि नागपूर ते इंदोर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
विशेष म्हणजे आगामी काळात मुंबई ते शेगाव, पुणे ते शेगाव, पुणे ते सिकंदराबाद, पुणे ते वडोदरा, मुंबई ते छत्रपती संभाजीनगर, मुंबई ते कोल्हापूर अशा मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू होणार असा दावा केला जात आहे.