Vande Bharat Express : सध्या देशात वंदे भारत एक्सप्रेसच्या विशेष चर्चा पाहायला मिळत आहेत. ही संपूर्ण भारतीय बनावटीची ट्रेन 2019 मध्ये रेल्वे प्रवाशांच्या सेवेत आली. सेवेत दाखल झाल्यानंतर ही गाडी अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीच खरी उतरली.
यामुळे भारतीय रेल्वेने देशभरातील महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वे ऑगस्ट 2023 पर्यंत जवळपास देशातील 75 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी चालवणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. अशातच महाराष्ट्रासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे राज्याला आणखी एक वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी याबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. दानवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड विभागातील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर जालना, छत्रपती संभाजीनगर मार्गे वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे.
मात्र आगामी एका महिन्यात जालन्याहून इलेक्ट्रिक इंजिनसह जनशताब्दी एक्सप्रेस धावणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. यासाठी रेल्वेच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मनमाड(अंकाई) ते परभणी रेल्वे मार्ग दरम्यान सध्या विद्युतीकरणाचे काम सुरू आहे.
यामध्ये मनमाड-छत्रपती संभाजीनगर-जालना या मार्गावरील विद्युतीकरणाचे काम आता पूर्ण झाले आहे. विशेष बाब म्हणजे जालना ते परभणी दरम्यानचे विद्युतीकरणाचे काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे.
तसेच मनमाड ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनसह रेल्वे चालवण्याची चाचणी देखील यशस्वीरित्या पार पडली आहे. तसेच जालन्यापर्यंतची चाचणी देखील लवकरच पूर्ण केली जाणार आहे. ही चाचणी झाली की या मार्गावर जनशताब्दी एक्सप्रेस इलेक्ट्रिक इंजिनसह धावण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
कोणत्या मार्गांवर धावणार वंदे भारत एक्सप्रेस?
नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नांदेड ते मुंबई या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार अशी घोषणा केली होती. तर सिकंदराबादसाठी ही रेल्वेगाडी चालवली जाणार आहे. दरम्यान ही वंदे भारत एक्सप्रेस गाडी विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर सुरू होणार आहे. नांदेड विभागअंतर्गत येणाऱ्या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरणाचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणार अशी माहिती रेल्वेने दिली आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री काय म्हणताय?
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी याबाबत मोठी माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदे भारत एक्सप्रेस इलेक्ट्रिकवर धावते. यामुळे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर ही गाडी सुरू होणार आहे. तसेच या मार्गांवत जनशताब्दी एक्सप्रेस धावणार असून यासाठी सध्या ट्रायल सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.