Vande Bharat Express : गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण देशभरात वंदे भारत एक्सप्रेसच्या विशेष चर्चा पाहायला मिळत आहेत. ही संपूर्ण भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेन अगदी कमी कालावधीत रेल्वे प्रवाशांच्या पसंतीस खरी उतरली आहे. सध्या स्थितीला देशातील 25 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू आहे.
विशेष म्हणजे आगामी काही महिन्यात आणखी काही महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डाकडून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयानुसार देशातील एका महत्त्वाच्या मार्गावर 24 सप्टेंबरला वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यास रेल्वे बोर्डाकडून मान्यता मिळाली आहे. यामुळे आता देशभरातील वंदे भारत एक्सप्रेसची संख्या 25 वरून 26 होणार आहे.
कोणत्या मार्गावर सुरू होणार वंदे भारत
मीडिया रिपोर्टनुसार, बिहारची राजधानी पटना आणि पश्चिम बंगाल येथील हावडा दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार आहे. या गाडीला 24 सप्टेंबर रोजी हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ही गाडी सुरू झाल्यानंतर पटना ते हावडा दरम्यानचा प्रवास गतिमान होण्यास मदत मिळणार आहे. ही गाडी सुरू करण्यासाठी रेल्वे बोर्डाने देखील परवानगी दिली आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवाशांची आतुरता आता लवकरच संपणार असे चित्र आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 24 सप्टेंबरला दुपारी साडेबारा वाजता पटना जंक्शन येथून या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. दरम्यान, रेल्वे बोर्डने उद्घाटनाच्या तारखेची माहिती दिल्यानंतर रेल्वे प्रशासनाने उद्घाटनासाठी आवश्यक पूर्वतयारी करण्यास सुरुवात देखील केली आहे. या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसच वेळापत्रक आणि तिकीट दर निश्चित करण्यात आलेले नाहीत. पण याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.
पटना ते हावडा हे 530 किलोमीटरचे अंतर ही गाडी मात्र साडेसहा तासात पूर्ण करणार आहे. या मार्गावरील ट्रायल रन गेल्या महिन्यातच पूर्ण झाले होते आणि आता या मार्गावर प्रत्यक्षात 24 सप्टेंबरला वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. या गाडीचे वेळापत्रक अद्याप समोर आलेले नाही मात्र काही मीडिया रिपोर्ट मध्ये ही गाडी पटना जंक्शन येथून सकाळी आठ वाजता हावडाकडे रवाना होईल आणि हावडाला ही गाडी अडीच वाजता पोहोचेल असे सांगितले जात आहे. तसेच या गाडीचा हावडा येथून सायंकाळी चार वाजता परतीचा प्रवास सुरू होईल आणि रात्री साडेदहा वाजता ही गाडी पटना जंक्शनला पोहोचेल अशी माहिती समोर आली आहे.