Vande Bharat Sleeper Train : सध्या देशात वंदे भारत एक्सप्रेसची विशेष चर्चा आहे. या देशातील पहिल्या भारतीय बनावटीच्या ट्रेनचे जाळे विस्तारण्यासाठी भारतीय रेल्वे सध्या युद्धपातळीवर काम करत आहे. आतापर्यंत देशातील एकूण 34 महत्वाच्या मार्गावर ही गाडी सुरु आहे.
यापैकी 6 गाड्यां महाराष्ट्राला मिळाल्या आहेत. खरतर आतापर्यंत राज्यात 5 वंदे भारत एक्सप्रेस सुरु होत्या. पण नुकतेच 9 ऑक्टोबरला रेल्वे मंत्रालयाने इंदोर ते भोपाळ ट्रेनचा विस्तार केला आहे. ही ट्रेन आता नागपूर पर्यंत धावणार आहे. यामुळे राज्याला 6 वी वंदे भारत मिळाली आहे.
मध्यप्रदेशमधील इंदोर ते राज्याच्या उपराजधानीपर्यंतचा प्रवास या ट्रेनमुळे गतिमान होणार आहे. याशिवाय येत्या काही महिन्यात मुंबई ते कोल्हापूर दरम्यान देखील वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचे नियोजन आखले जात आहे. अशातच आता रेल्वेकडून देशात लवकरच वंदे भारत स्लीपर कोच आणि मेट्रो ट्रेन सुरू केली जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
रेल्वे बोर्डाचे सचिव मिलिंद देऊस्कर यांनी याबाबत एक अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी गुरुवारी याबाबत सांगितले की, रेल्वे लवकरच वंदे भारत स्लीपर कोच आणि वंदे भारत मेट्रो सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
केव्हा सुरु होणार वंदे भारत स्लीपर कोच ?
भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शंतनू रॉय यांनी देखील वंदे भारत स्लीपर कोच बाबत एक अपडेट दिली आहे. रॉय यांनी सांगितल्याप्रमाणे जर सर्वकाही व्यवस्थित राहिले तर या आर्थिक वर्षात वंदे भारत स्लीपर कोचचे पहिले प्रोटोटाइप तयार होईल आणि लवकरच वंदे भारत स्लीपर कोच सुरु होईल.
विशेष म्हणजे ही स्लीपर कोच वंदे भारत ट्रेन जागतिक दर्जाचा अनुभव प्रवाशांना देण्यास सक्षम राहील. खरतर स्लीपर वंदे भारत ट्रेन विकसित करण्यासाठी BEML इंटिग्रल कोच फॅक्टरी, चेन्नई आणि रेल्वे बोर्डासोबत सध्या युद्धपातळीवर काम करत आहे. एकंदरीत या चालू आर्थिक वर्षात ही ट्रेन सुरू होऊ शकते.
यामुळे आता लवकरच ही गाडी रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल असा आशावाद व्यक्त होऊ लागला आहे. दरम्यान, या वंदे भारत स्लीपर कोचमध्ये 16 डबे राहणार आहेत. यातून तब्बल 887 प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. या गाडीचा वेग तब्बल 160 किलोमीटर प्रतितास एवढा राहणार आहे.