Vande Bharat Sleeper Train : गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वेचा प्रवास मोठा आरामदायी झाला आहे. भारतीय रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांच्या सुविधेसाठी विविध निर्णय घेतले जात आहेत. रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची देशातील पहिली हायस्पीड ट्रेन देखील सुरू केली आहे.
ही गाडी 2019 मध्ये सुरू झाली आहे. सध्या ही गाडी देशातील 34 महत्त्वाच्या मार्गांवरील रुळांवर सुसाट धावत आहे. विशेष म्हणजे ज्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे तेथील रेल्वे प्रवाशांचा प्रवास हा खूपच आरामदायी आणि जलद झाला आहे.
या ट्रेनला रेल्वे प्रवाशांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद दाखवला आहे. मात्र सध्या स्थितीला सुरु असलेली वंदे भारत एक्सप्रेस ही फक्त चेअर कार मध्ये आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी या गाडीचा उपयोग होत नाहीये.
हेच कारण आहे की लांब पल्याच्या प्रवासासाठी आता वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन संदर्भात नुकतीच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, वंदे भारत स्लीपर ट्रेन 2024 मध्ये सर्वसामान्यांसाठी सुरू केली जाणार आहे. या वंदे भारत स्लीपर कोचचा पहिला प्रोटोटाइप देशातील इंटिग्रेटेड कोच फॅक्टरी, चेन्नईच्या सहकार्याने बेंगळुरूमधील भारत अर्थ मूव्हर लिमिटेडद्वारे डिझाइन आणि तयार केला जात आहे.
विशेष म्हणजे याचे काम युद्ध पातळीवर सुरू लवकरच हा प्रोटोटाईप तयार होणार आहे. त्यामुळे वंदे भारत स्लीपर ट्रेन येत्या काही महिन्यांमध्ये रुळावर धावणार असल्याचा आशावाद व्यक्त केला जात आहे. आता आपण या ट्रेनच्या काही विशेषता थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Vande Bharat Sleeper Train च्या विशेषता
वंदे भारत स्लीपर ट्रेन ही वंदे भारत एक्सप्रेस सारखीच वेगवान गाडी राहणार आहे. या गाडीचा ताशी वेग 160 किमी एवढा राहणार आहे. मीडिया रिपोर्ट नुसार, या ट्रेनला 16 डबे राहणार आहेत. या 16पैकी 11 डबे एसी-3 टियरचे असतील आणि 4 एसी-2 टियरचे असतील तर 1 फर्स्ट क्लास वातानुकूलित डब्बा असेल.
या ट्रेनमध्ये वंदे भारत एक्सप्रेस सारख्याच आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या ट्रेनची रचना देखील खूपच लक्झरीअस आणि आधुनिक राहणार आहे. ही गाडी प्रवाशांना आरामदायी प्रवास करता यावा यासाठी पूर्णपणे आधुनिक राहणार आहे.
या गाडीला स्वयंचलित तसेच इंटरकम्युनिकेशन डोअर राहणार आहेत. ट्रेनमध्ये व्हॅक्यूम टॉयलेट्स देखील बनवले जाणार आहे. प्रवाशांना वरच्या बर्थवर चढण्यासाठी जिने सुद्धा राहणार आहेत. बर्थसाठी वापरण्यात येणारे फोम आणि कव्हर्स खूपच चांगल्या दर्जाचे राहणार आहेत.
एकंदरीत ही गाडी आधुनिक सोयी सुविधांनी सज्ज राहणार आहे. यामुळे या गाडीचा प्रवास सर्वसामान्यांना आवडेल असा आशावाद व्यक्त केला जात आहे. ज्याप्रमाणे वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांनी पसंती दाखवली आहे तसीच पसंती याही गाडीला मिळेल असे रेल्वे अधिकाऱ्यांना वाटत आहे.