Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची देशातील पहिली हायस्पीड ट्रेन असल्याचा दावा केला जात आहे. ही देशातील मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत तयार झालेली पहिली हायस्पीड ट्रेन 2019 मध्ये सुरू झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे यापैकी आठ मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत. राज्यातील मुंबई ते गांधीनगर, मुंबई ते अहमदाबाद, मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते जालना, मुंबई ते गोवा, नागपूर ते बिलासपूर आणि इंदोर ते नागपूर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
विशेष म्हणजे वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर आता भारतीय रेल्वे लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करणार असल्याची बातमी समोर येत आहे.
वंदे भारत स्लीपर ट्रेन नेमकी केव्हा सुरू होणार या संदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी माहिती दिली आहे.
काय म्हटलेत केंद्रीय रेल्वेमंत्री
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत स्लीपर ट्रेन बाबत माहिती देताना असे म्हटले आहे की, येत्या सहा महिन्यात ही गाडी रुळावर धावण्याची शक्यता आहे. सध्या स्थितीला भारतीय रेल्वेच्या ताफ्यात ज्या स्लीपर ट्रेन आहेत त्यांच्यात छताची उंची खूपच कमी आहे.
त्यामुळे मधल्या आणि वरील बर्थ मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. पण, भारतीय रेल्वेच्या ताफ्यात नव्याने समाविष्ट होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस स्लीपर ट्रेनमध्ये ही जागा खूपच अधिक राहणार आहे.
वंदे भारत एक्सप्रेस स्लीपर ट्रेनच्या छताची उंची ही अधिक राहणार आहे. त्यामुळे वंदे भारत स्लीपर ट्रेनमधून प्रवास करताना प्रवाशांना अडचणी भासणार नाहीत.
दरम्यान पहिल्या टप्प्यात 10 स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन तयार होणार असून येत्या सहा महिन्यात या गाड्या चाचणीसाठी उपलब्ध होतील अशी आशा आहे. या ट्रेनच्या प्रत्येक कोचमध्ये एकूण 67 प्रवासी प्रवास करू शकणार आहेत.
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन महाराष्ट्रातून धावणार
मध्यंतरी काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन आपल्या महाराष्ट्रातून धावणार अशी माहिती समोर आली होती. ही गाडी मुंबई ते दिल्लीदरम्यान चालवली जाईल असे देखील वृत्त काही वृत्तवाहिन्यांमध्ये झळकले आहे.
त्यामुळे आता पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन केव्हा सुरू होणार आणि ही गाडी आपल्या महाराष्ट्रातून सुरू होणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.