Vande Metro Train : महाराष्ट्राची राजधानी अर्थातच मुंबईला पश्चिम रेल्वे आणखी एक वंदे भारत एक्सप्रेसची भेट देणार आहे. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जाणार आहे. यासाठी पश्चिम रेल्वे कडून रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव सादर केला जाणार असून या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर या मार्गावर ही गाडी सुरू होणार आहे. अशातच उपराजधानी नागपूरला देखील एक मोठी भेट मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
नागपूरला आता वंदे भारत एक्सप्रेसची नाही तर वंदे मेट्रोची भेट दिली जाणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वेच्या माध्यमातून वंदे भारत एक्सप्रेसच्या धर्तीवर वंदे मेट्रो ट्रेन चालवली जाणार आहे. सध्या वंदे मेट्रो चेन्नईच्या आयसीएफ कोच फॅक्टरी मध्ये तयार केली जात आहे.
विशेष म्हणजे या चालू वर्षी अर्थातच 2023 च्या अखेरपर्यंत ही वंदे मेट्रो तयार होणार आहे. ही वंदे मेट्रो मार्च 2024 पर्यंत प्रवाशांसाठी सुरू केली जाणार आहे. ही वंदे मेट्रो ट्रेन इंटरसिटी म्हणून चालवली जाणार असून 100 किलोमीटर व त्यापेक्षा कमी अंतर असलेल्या शहरांना ही वंदे मेट्रो जोडण्याचे काम करणार आहे.
यातच उपराजधानीहुन देखील ही वंदे मेट्रो सुरु होणार आहे. ही गाडी नागपूर ते गोंदिया, काटोल, सावनेर, उमरेड दरम्यान चालवली जाणार अशी योजना आखण्यात आली आहे. निश्चितच नागपूरला या मेट्रोची भेट मिळाली तर नागपूरकरांचा प्रवास गतिमान होणार यात शँकाच नाही.
खरंतर वंदे भारत एक्सप्रेसची सुरुवात अवघ्या चार वर्षांपूर्वी म्हणजेच 2019 मध्ये झाली. ही गाडी सुरू झाली आणि अवघ्या काही दिवसात रेल्वे प्रवाशांच्या पसंतीची गाडी खरी उतरली. हेच कारण आहे की, ही गाडी देशातील सर्वच महत्त्वाच्या मार्गावर चालवली जात आहे.
आतापर्यंत देशातील 25 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू झाली असून आपल्या महाराष्ट्रातील पाच महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी धावत आहे. एवढेच नाही तर वंदे भारत एक्सप्रेसची लोकप्रियता पाहता आता या गाडीच्या नवनवीन आवृत्त्या देखील तयार केल्या जाणार आहेत. यानुसार वंदे भारत स्लीपर कोच, वंदे मेट्रो, मिनी वंदे भारत एक्सप्रेस, नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेस देखील भारतीय रेल्वेच्या माध्यमातून सुरू केल्या जाणार आहेत.