Voter ID Card News : भारतात लवकरच लोकशाहीचा महा कुंभ सजवणार आहे. आता, भारतात लोकसभेच्या निवडणुका सुरू होणार आहे. सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला संपणार असून तत्पूर्वी आगामी अठराव्या लोकसभेसाठी निवडणुका घेतल्या जाणार आहेत.
अशा परिस्थितीत, मतदान करताना मतदान कार्ड आवश्यक राहणार आहे. मतदान कार्ड फक्त मत देण्यासाठीच गरजेचे असते असे नाही तर हे एक प्रमुख शासकीय दस्तऐवज देखील आहे. 18 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी मतदार ओळखपत्र हे अनिवार्य दस्तऐवज आहे.
ते मतदानासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना दिले जात असते. मात्र हे मतदान कार्ड अपडेट करताना अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतो. प्रामुख्याने नव्याने लग्न झालेल्या महिलांना मतदान कार्ड अपडेट करताना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
नवीन लग्न झाल्यानंतर महिला सासरी जाते आणि अशावेळी महिलेला सासरचा पत्ता मतदान कार्ड अपडेट करावा लागतो. मात्र, मतदान कार्ड मध्ये नवीन पत्ता अपडेट करायचा कसा हाच सवाल अशा महिलांना पडतो.
दरम्यान आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत. मतदान कार्ड मध्ये नवीन पत्ता कसा अपडेट करायचा किंवा नवीन पत्त्यावर मतदान कार्ड कसे ट्रान्सफर करायचे याविषयी आज आपण थोडक्यात माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पत्ता अपडेट करताना या कागदपत्रांची गरज भासेल
एक वर्षाच्या आतील विज बिल किंवा पाणीपट्टी किंवा गॅस बिल, राष्ट्रीयकृत किंवा शेड्युल्ड बँक किंवा पोस्ट ऑफिसचे चालू पासबुक, आधार कार्ड, भारतीय पासपोर्ट, महसूल विभागाच्या जमीन-मालकी नोंदी, भाडे करार, नोंदणीकृत विक्री करार अशा काही कागदपत्रांची गरज भासणार आहे.
कसा अपडेट करणार पत्ता?
सर्व प्रथम राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल (NVSP) वेबसाइटवर जा. https://voters.eci.gov.in/ ही लिंक राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलची आहे. तुम्हाला मतदान कार्ड मधील पत्ता अपडेट करण्यासाठी या वेबसाईटवर जावे लागणार आहे.
येथे गेल्यानंतर तुम्हाला होम पेजवर ‘शिफ्टिंग ऑफ रेसिडेन्स’ हा पर्याय दिसेल. ज्यामध्ये तुम्हाला Fill Form 8 वर टॅप करून तो भरावा लागेल. आता ‘सेल्फ’ वर क्लिक करा आणि EPIC क्रमांक टाका आणि सबमिट करा.
येथे तुम्हाला तुमच्या मतदार तपशीलांचे पुनरावलोकन करावे लागेल आणि नंतर ‘शिफ्टिंग ऑफ रेसिडेन्स’ वर क्लिक करा. काही महत्त्वाचे तपशील फॉर्म 8 मध्ये भरावे लागतील. राज्य, जिल्हा, विधानसभा, आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक, ईमेल आणि नवीन पत्ता इत्यादी माहिती भरावी लागणार आहे.
तसेच आवश्यक कागदपत्र देखील अपलोड करावे लागेल. ही सर्व माहिती पूर्ण भरली की फॉर्म सबमिट करावा लागतो. फॉर्म 8 भरल्यानंतर, अर्जाचा संदर्भ क्रमांक नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि ईमेलवर पाठविला जाईल. ही संपूर्ण प्रोसेस पूर्ण झाली की काही दिवसांनी तुम्ही NVSP पोर्टलवरून डिजिटल व्होटर आयडी कार्ड डाउनलोड करू शकता.