Weather Update : येत्या सहा दिवसात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. दरम्यान या नवीन वर्षाच्या अर्थातच 2024 च्या सुरुवातीलाच देशातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून यावेळी वर्तवण्यात आली आहे.
यामुळे अगदी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. अवकाळी पावसामुळे संबंधित भागातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारून चालणार नाही.
भारतीय हवामान विभाग (IMD) च्या मते, नवीन वर्षाची सुरुवात दिल्लीसह उत्तर भारतात पावसाने होऊ शकते.
30 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान हरियाणा, पंजाब, राजस्थान, हिमाचल प्रदेश, दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. याशिवाय या काळात देशाच्या अनेक भागात कडाक्याची थंडीही पडणार असा अंदाज आहे.
तसेच भारतीय हवामान विभागाने 27 आणि 28 डिसेंबर रोजी तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
या राज्यांमध्येही पाऊस हजेरी लावणार
आगामी 2 दिवसांत देशातील ईशान्यकडील भागात ईशान्य भारतात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
IMD नुसार, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये वादळी पाऊस पडेल असा अंदाज आहे. या संबंधित भागांमध्ये एकाकी वादळासह गारपिट होऊ शकते असे बोलले जात आहे.
या राज्यातील तापमानात होणार घट
येत्या दोन दिवसात उत्तर पश्चिम भारतात आणि त्या लगतच्या मध्य भारतात किमान तापमान दोन ते चार अंशाने कमी होईल असा अंदाज आहे. पूर्व भारतात देखील आगामी दोन दिवसात दोन अंशाने किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
याचा परिणाम म्हणून पूर्व भारत, मध्य भारत आणि उत्तर पश्चिम भारतात थंडीचा जोर काहीसा आणखी वाढेल असा अंदाज आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील आता कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे.
हवामान खात्याने आगामी काही दिवस राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहील आणि थंडीचा जोर वाढेल असे सांगितले आहे.