Agriculture News : महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील केशरी रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यातील केशरी रेशन कार्डधारकांना आता अन्नधान्य ऐवजी प्रति लाभार्थी 150 रुपये प्रति महिना रोख रक्कम दिली जाणार आहे.
याचा लाभ हा जानेवारी 2023 पासून संबंधितांना मिळणार आहे. दरम्यान या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्डधारकांना एक महत्त्वाचे काम करण्याची सूचना देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी आपले बँक अकाउंट आधार सोबत लिंक करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
ज्या शिधापत्रिकाधारक लोकांनी अद्याप आधारला बॅंकेचा अकाऊंट नंबर लिंक केलेला नाही, अशांनी आपल्या बँक खात्याला लवकरात लवकर आधार लिंक करून घ्यावे असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
तसेच या योजनेअंतर्गत केशरी रेशन कार्डधारकांना दिली जाणारी प्रति लाभार्थी 150 रुपये प्रति महिना ही रक्कम 10 जुलैपासून संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
यामुळे जर तुम्हीही राज्यातील या 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील केशरी रेशन कार्डधारक असाल तर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे बँक खाते आधार सोबत संलग्न करावे लागणार आहे.
नवीन योजना सुरु करण्याचे कारण काय?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, याआधी या चौदा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील केशरी रेशन कार्डधारक शेतकऱ्यांनाही प्राधान्य गटातील कुटुंब लाभार्थ्याप्रमाणे दरमहा प्रती सदस्य 5 किलो अन्नधान्य मिळत.
यात 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ मिळत होता. पण आता या योजनेअंतर्गत गहू व तांदूळ उपलब्ध होणार नाहीये. भारतीय अन्न महामंडळाने राज्य सरकारला याबाबत माहिती दिली आहे.
यामुळे राज्य सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता लाभार्थ्यांना अन्नधान्य देण्याऐवजी थेट रक्कम दिली जाणार आहे. दरम्यान आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खात्याला आधार क्रमांक लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे.