Agriculture News : मान्सून महाराष्ट्रात त्याच्या ठरलेल्या वेळेप्रमाणे जवळपास पाच दिवस उशिराने दाखल झाला. 11 जूनला मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले. मात्र आगमन झाल्यानंतरही 23 जून पर्यंत राज्यात कुठेच पाऊस पडला नाही. मोसमी पाऊस तर सोडाच पण पूर्व मौसमी पावसाने देखील दडी मारली. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत होती.
अशातच मात्र 23 जून पासून हवामानात बदल झाला आणि राज्यात सर्वत्र पावसाला सुरुवात झाली. हवामान विभागाने 24 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पोहोचल्याची अधिकृत घोषणा केली. यामुळे आता सर्व काही नीट होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. अशा स्थितीत बहुतांशी भागात पहिला पाऊस पडताच पेरणीच्या कामाला सुरुवात झाली.
अनेक ठिकाणी खरीप हंगामातील पीक पेरणी पूर्ण झाली आहे. काही भागात मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार जून महिन्यातील सुरुवातीच्या 21 दिवसात सरासरीच्या तुलनेत केवळ 11.5 टक्के एवढाच पाऊस झाला आहे. अशातच जुलै महिन्यातील पावसासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यातील पहिल्या आठवड्यात पुन्हा एकदा पाऊस विश्रांती घेणार आहे. जुलै महिन्यातील पहिला पंधरवड्यात काही दिवस पावसाची उघडीप राहणार आहे. पहिल्या पंधरवड्यातील काही दिवस हवामान कोरडे राहणार असल्याने शेतकरी बांधवांनी खरीप हंगामातील पीक पेरणीसाठी थोडा संयम बाळगला पाहिजे असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
किमान 80 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. एकंदरीत जून महिन्यात सरासरीपेक्षा केवळ 11 टक्के पाऊस झाला यामुळे संकटात सापडलेला खरीप हंगाम जुलै महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात काही दिवस हवामान कोरडे राहणार असल्याने पूर्णपणे प्रभावित होण्याची दाट शक्यता आहे.
अशा स्थितीत शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई न करता किमान 80 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. अन्यथा जर शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई केली आणि जुलै महिन्यात पावसाची उघडीप राहिली तर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागू शकते. यामुळे शेतकऱ्यांना पेरणी करताना विशेष सतर्कता बाळगावी लागणार आहे.