Agriculture News : भारतात शेती हा एक मुख्य व्यवसाय आहे. आपल्या देशाची ओळख ही शेतीवरूनच होते. आपल्या देशाला कृषीप्रधान देशाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. याचे कारण म्हणजे देशाची जवळपास 50 टक्के लोकसंख्या ही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या शेतीवर अवलंबून आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत देखील शेती क्षेत्राचा मोठा वाटा आहे. दरम्यान, भारतीय शेतीचा विचार केला असता काळानुरूप यामध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत.
शेतकऱ्यांनी आता पीक पद्धतीत देखील अमुलाग्र बदल केले आहेत. विविध पिकांची शेतकरी बांधव शेती करत आहेत. दरम्यान, आज आपण अशा एका पिकाची माहिती जाणून घेणार आहोत ज्याची लागवड केल्यास शेतकऱ्यांना लाखो रुपयांची कमाई अगदी सहजतेने होणार आहे.
विशेष बाब म्हणजे या पिकाच्या शेतीसाठी शेतकऱ्यांना कमी पाण्याचा वापर करावा लागतो. अर्थातच दुष्काळी भागात देखील या पिकाची लागवड शेतकऱ्यांना सहजतेने करता येऊ शकते. आम्ही ज्या पिकाबाबत बोलत आहोत ते आहे इसबगोल. इसबगोलची लागवड ही प्रामुख्याने गुजरात मध्ये केली जाते.
गुजरात राज्यात या पिकाची मोठ्या प्रमाणात शेती होत असून तेथील शेतकऱ्यांना यातून लाखो रुपयांची कमाई होत आहे. गुजरात मधील एका शेतकऱ्याने या शेतीमधला आपला अनुभव बीबीसी मराठी या वृत्तसंस्थेला शेअर केला आहे.
त्यांनी सांगितले आहे की, दोन वर्षांपूर्वी त्यांनी इसबगोलची लागवड केली होती. त्यांनी दोन वर्षांपूर्वी दोन बिघे जमिनीत इसबगोलची लागवड केली आणि यातून त्यांना जवळपास दोन लाख वीस हजारापर्यंतचे उत्पन्न मिळाले होते.
यामुळे त्यांनी यंदा दहा बिघे जमिनीवर इसबगोलची लागवड केली असून यातून त्यांना जवळपास 100 मण एवढे उत्पादन मिळण्याची आशा आहे. सध्या स्थितीला इसबगोल हे बाजारात आठ हजार 750 रुपये प्रतिक्विंटल या दरात विकले जात आहे.
म्हणजेच प्रतिमन 3 हजार 500 रुपये एवढा भाव मिळत आहे. अर्थातच या पिकाची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणारी आहे. यामुळे आज आपण या पिकासाठी आवश्यक असलेले हवामान, जमीन इत्यादींची माहिती जाणून घेणार आहोत.
कोणत्या जमिनीत करणार लागवड
कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे इसबगोल हे हिवाळ्याच्या हंगामातील पीक आहे. हे पीक हलकी, वालुकामय, मध्यम काळी आणि पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत सहजतेने उत्पादित केले जाऊ शकते. मात्र जर जमीन पाणी धरून ठेवत असेल तर अशा जमिनीत हे पीक सडू शकते.
हवामान कसे लागते ?
या पिकाची लागवड हिवाळी हंगामात केली जाते. या पिकाला खूपच कमी पाणी लागते. त्यामुळे दुष्काळी भागात देखील याची लागवड होऊ शकते. या पिकाला कोरड आणि थंड हवामान आवश्यक असतं. हे पीक आद्रता आणि गारपीट झाल्यास खराब होऊ शकते. पावसाचा देखील या पिकाला मोठा फटका बसतो.
या किटक आणि रोगाचा फटका बसतो
या पिकाला उधई म्हणजे वाळवी लागण्याची भीती असते. यामुळे शेतकऱ्यांना या कीटकावर वेळेत नियंत्रण मिळवावे लागते. इसबगोलवर एफिड्स नावाचा रोग पडू शकतो. यामुळे पिकावर वेळोवेळी तज्ञांच्या सल्ल्याने कीटकनाशकांची फवारणी करावी लागते. तसेच चांगल्या जोमदार वाढीसाठी योग्य मात्रांमध्ये खते देखील द्यावी लागतात.