Agriculture News : पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळा सुरू होऊन जवळपास दीड महिन्यांचा काळ उलटला आहे. मात्र अजूनही राज्यातील बहुतांशी भागात समाधानकारक असा पाऊस झालेला नाही. जुलै महिना निश्चितच पावसाचा जोर वाढला आहे परंतु तरीही अपेक्षित असा पाऊस पडलेला नाही.
मात्र आगामी काही दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणारा असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. निश्चितच बळीराजासाठी हवामाना विभागाची ही वार्ता दिलासा देणारी सिद्ध होणार आहे. मात्र पावसाळ्यात विंचू आणि सर्पदंशाचे प्रमाण वाढतात.
पावसाळ्यात बिळात पाणी साचत असल्याने सर्प व विंचू बाहेर पडतात आणि ते आश्रय शोधण्यासाठी घरात, घराजवळच्या अडगळीच्या खोलीत किंवा परसबागेत येतात. अशा परिस्थितीत पावसाळ्यात साप चावण्याच्या आणि विंचू चावण्याच्या घटना वाढतात.
शेती काम करताना देखील सर्पदंश आणि विंचू चावण्याच्या घटना घडतात. मात्र साप आणि विंचू चावल्यानंतर काय उपाययोजना केल्या पाहिजेत याची अनेकांना माहिती नसते आणि यामुळे लोकांचा जीव धोक्यात येतो.
प्रामुख्याने विषारी साप चावल्यास योग्य उपाययोजना केल्या नाहीत तर व्यक्तीचा जीव देखील जाऊ शकतो. त्यामुळे साप चावल्यानंतर किंवा विंचू चावल्यानंतर काय उपाययोजना केल्या पाहिजेत याबाबत आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सर्पदंश झाल्यानंतर काय करावे?
आजही ग्रामीण भागात साप चावल्यानंतर डॉक्टरांकडे घेऊन न जाता मांत्रिकाकडे घेऊन जाण्याची रीत आहे. ग्रामीण भागातील लोकांचा असा समाज आहे की साप चावल्यानंतर साप उतरवणारा मनुष्य म्हणजेच मांत्रिकाच्या मंत्राने शरीरातील सापाचे विष उतरते. मात्र, मंत्राच्या साह्याने सापाचे विष उतरत नाही. परिणामी जर विषारी साप चावला असेल तर एखाद्या व्यक्तीचे आयुष्य धोक्यात येऊ शकते. यामुळे साप चावल्यानंतर मांत्रिकाकडे न जाता थेट रुग्णालयात सर्पदंश झालेल्या व्यक्तीला घेऊन जाणे आवश्यक राहते.
जाणकार लोक सांगतात की, साप चावल्यानंतर सर्वप्रथम ती जागा स्वच्छ पाण्याने धुऊन काढा. जर साप विषारी असेल आणि तो हाताला चावला असेल तर दंडाला दोरी बांधा. पायाला चावला असेल तर मांडीला दोरी बांधा.
साप चावलेल्या ठिकाणी चिरा मारू नका. अनेक लोक साप चावलेल्या ठिकाणी चिरा मारतात. लोकांचा असा समाज आहे की चिरा मारल्याने सापाचे विष बाहेर पडते मात्र तसे होत नाही. याउलट चिरा मारल्याने जास्तीचा रक्तस्त्राव होतो आणि यामुळे व्यक्तीच्या जीवाला धोका पोहोचू शकतो.
साप चावलेल्या ठिकाणाहून विष शोषून घेण्याचा प्रयत्न करू नका.
साप चावलेल्या व्यक्तीला घाबरवू नका त्याला धीर द्या. अशा व्यक्तीस घाबरवले तर रक्ताभिसरण जलद गतीने होते आणि यामुळे विष पूर्ण शरीरात जलद गतीने पसरू शकते.
साप चावलेल्या व्यक्तीला जास्त हालचाल करू देऊ नका. आवश्यक असल्यासच हालचाल करू द्या.
साप चावलेल्या व्यक्तीला जमिनीवर झोपवा.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशा व्यक्तीला लवकरात लवकर जवळील सरकारी दवाखान्यात दाखल करा. साप विषारी होता का बिनविषारी याची कल्पना डॉक्टरांना द्या.
विंचु चावल्यास काय करावे?
विंचू चावला की ग्रामीण भागात आजही मंतरण्याची पद्धत आहे. म्हणजेच मांत्रिकाकडे घेऊन जाण्याची पद्धत आहे. मात्र विंचू चावल्यानंतर मांत्रिकाकडे घेऊन न जाता डॉक्टरांकडे घेऊन जाणे आवश्यक आहे.
विंचूच्या दंशाने मृत्यू होत नाही मात्र तरीही विंचू चावल्यानंतर डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे. अन्यथा जखम चिघळू शकते आणि यामुळे आरोग्यावर अपायकारक परिणाम होऊ शकतात.