Agriculture News : गेल्या वर्षी महाराष्ट्रात खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक पावसाच्या भक्षस्थानी आले. याबरोबरच रब्बी हंगामामध्ये देखील राज्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने आणि गारपिटीने हजेरी लावली. यामुळे देखील राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.
गेल्या वर्षी सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत तसेच या चालू वर्षी मार्च ते एप्रिल या कालावधीत अवकाळी पावसाने मोठा हाहाकार माजवला. या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील पीक वाया गेले तसेच फळबागांना मोठा फटका बसला.
यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रशासनाला पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेत. यानुसार, संबंधितांनी पंचनामे केलेत आणि बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केलेत.
दरम्यान, शासनाने मध्यंतरी सततच्या पावसामुळे होणारे नुकसान देखील मदतीसाठी पात्र राहणार असा शासन निर्णय जारी केला. सोबतच बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी एक हजार पाचशे कोटी रुपयांचा निधीला मान्यता देण्यात आली. यामुळे बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळणार अशी भोळी भाबडी आशा बळीराजाला लागून होती.
मात्र अजूनही असे अनेक बाधित शेतकरी आहेत ज्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे संबंधित बाधित शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात नाराजी पाहायला मिळत आहे. तसेच पुन्हा एकदा सरकारी काम आणि सहा महिने थांब याची प्रचिती येत आहे. अशातच मात्र याबाबत एक मोठी माहिती आमच्या हाती आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतीपीकांच्या नुकसानीबाबत शासनाच्या ई-पंचनामा या ऑनलाइन पोर्टलवर अपलोड केलेल्या बाधित शेतकऱ्यांच्या याद्या सर्व तहसिल कार्यालये, तलाठी कार्यालये व बाधित ग्रामपंचयात कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मात्र असे अनेक बाधित शेतकरी आहेत ज्यांनी ई-केवायसी तसेच बँक खाते आधार कार्डसोबत संलग्न केलेले नाही. यामुळे या अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शासनामार्फत नुकसानीची रक्कम जमा झालेली नाही.
अर्थातच नुकसान भरपाईची रक्कम ज्या शेतकऱ्यांनी केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली आहे तसेच बँक खाते आधार कार्ड सोबत संलग्न केले आहे अशाच शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल त्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी आणि त्यांना मग नुकसान भरपाई मिळेल असे सांगितले जात आहे.