Agriculture Viral News : शेतकऱ्यांचे त्यांच्या दावणीला बांधलेल्या बैलजोडीवर खूप प्रेम असते. बैलाची सर्जा-राजाची जोडी खरी शेतकऱ्याची शान आहे. शेतकरी बांधव आपल्या बैलांना अगदी परिवारातील सदस्य प्रमाणेच जीव लावतात. त्यांना अगदी पोटी जन्मलेल्या लेकाप्रमाणे वागवतात. बैल देखील आपल्या मालकावर कितीही संकटे आलीत तर मोठ्या ईमानाने स्वामीभक्ती निभावतात.
वास्तविक, आता आधुनिकीकरणाचा काळ आहे. बैलांच्या सहाय्याने आता शेतीची कामे फारशी केली जात नाही. ट्रॅक्टरच्या सहाय्याने सर्व कामे केली जात आहेत. मात्र असे असले तरी शेतकरी आपल्या दावणीला आवर्जून बैल ठेवतात. काही हौशी शेतकरी तर दावणीला शोभायला पाहिजे म्हणून लाखो रुपयाची बैलजोडी खरेदी करतात. दरम्यान नासिक जिल्ह्यात अशीच एक घटना घडली आहे.
नासिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्याच्या मुंजवाड या गावातील एका हौशी शेतकऱ्याने तब्बल पाच लाख 51 हजार रुपयाला बैलजोडीची खरेदी केली आहे. यामुळे सदर शेतकऱ्याची जिल्ह्यात मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मौजे मुंजवाड येथील शेतकरी राजू बाबा सूर्यवंशी यांनी नामपुर येथील सुप्रसिद्ध बैल बाजारातून खिलार जातीच्या बैलांची जोडी पाच लाख 51 हजार रुपयाला काल अर्थातच बुधवारी खरेदी केली आहे.
सूर्यवंशी यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी खरेदी केलेली ही बैलजोडी दरवर्षी एकादशीला काढण्यात येणाऱ्या मुंजवाड ते बेज पायी दिंडीतील रथासाठी घेण्यात आली आहे. त्यामुळे बैल जोडी सांगितलेल्या किमतीत विकत घेतली आहे. देवाच्या कामाला बैल जोडी खरेदी केली असल्याने या बैल जोडीचा सौदा केला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. ही बैल जोडी अहमदनगर जिल्ह्यातील आहे. ही जोडी विक्रीसाठी नासिक येथील सटाणा तालुक्यातील नामपुर बैल बाजारात आली होती. यामुळे अहमदनगरची बैल जोडी आता नाशिकच्या दावणीला बांधली गेली असल्याचे बोलले जात आहे.