Ahmednagar District Division : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात आकारमानाने मोठ्या असलेल्या जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आणि नागरिकांच्या माध्यमातून केली जात आहे. विशेष म्हणजे राज्यातील जवळपास 18 जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन 22 जिल्हे तयार करण्याचा प्रस्ताव देखील राज्य शासन दरबारी धुळखात पडून आहे.
यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वाधिक मोठ्या जिल्ह्याच्या अर्थातच अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाच्या देखील चर्चा आहेत. अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर हे नवीन जिल्हे तयार करण्याचे प्रस्तावित आहे. अशातच अहमदनगर जिल्हा विभाजनाच्या मागणीला फोडणी देण्याचा एक निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.
खरंतर गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली. यानुसार अहमदनगरचे पुण्यश्लोक अहिल्यानगर असे नामांतरण करण्याचे त्यांनी जाहीर केले. याबाबत अद्याप पुढील प्रक्रिया बाकी असतानाच आता अहमदनगर संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाने अहमदनगर जिल्ह्यात प्रशासकीय सोयीसाठी नवीन अपर जिल्हाधिकारीपद मंजूर करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे याचे कार्यालय शिर्डी येथे तयार केले जाणार आहे. यामुळे शासनाचा हा निर्णय म्हणजेच जिल्हा विभाजनाकडील वाटचाल असल्याची चर्चा आता जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून जिल्हा निर्मितीसाठीच्या या हालचाली असल्याचे मत काही जाणकारांकडून देखील व्यक्त होत आहे.
वास्तविक, अहमदनगर जिल्हा विभाजनाचा आणि नामांतराचा मुद्दा हा फार जुना आहे. कदाचित आपल्यापैकी अनेकांचा तेव्हा जन्म देखील झाला नसावा तेव्हापासून हे दोन्ही मुद्दे अहमदनगरच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आलेले आहेत. हे दोन्ही मुद्दे अहमदनगरच्या राजकारणाची दिशा आणि दशा ठरवण्यास सक्षम आहेत. या मुद्द्यावरूनच अहमदनगरमधील राजकारणाची दिशा ठरत असते.
विशेष म्हणजे निवडणुका आल्या की या दोन्ही मुद्द्यांना फोडणी दिली जाते. मात्र यावर सकारात्मक आणि योग्य मार्ग आत्तापर्यंत निघालेला नव्हता. परंतु या दोन पैकी एका मुद्द्यावर अर्थातच नामांतराच्या मुद्द्यावर शिंदे फडणवीस सरकारने मोहर लावली आहे. पुण्यश्लोक अहिल्यानगर असं अहमदनगरचे आता नामकरण करण्याला सरकारने मंजुरी दिली असून याची पुढील प्रक्रिया सध्या सुरू आहे.
आशा आहे की लवकरच अहमदनगरला हे नवीन नाव दिले जाईल. विभाजनाच्या मुद्द्यावर मात्र अजूनही परिस्थिती पूर्वी सारखीच आहे. नवीन जिल्ह्याचे मुख्यालय संगमनेर, शिर्डी की श्रीरामपूर यावरून वाद आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांपूर्वी अपर पोलीस अधीक्षकांचे कार्यालय श्रीरामपूर येथे झाले. यामुळे श्रीरामपूर जिल्ह्याचे नवीन मुख्यालय होईल असं वाटू लागलं होत.
शिवाय बाळासाहेब थोरात महसूल मंत्री असताना संगमनेरला नवीन मुख्यालय व्हावे यासाठी जोरकस मागणी झाली होती. आणि आता राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री असताना नवीन अपर जिल्हाधिकारी पद प्रशासकीय सेवेसाठी तयार करण्यात आले असून याचे कार्यालय आता शिर्डी येथे होणार आहे. यामुळे जिल्हा विभाजनाकडे ही वाटचाल आहे असा दबक्या पावलांनी संकेत येऊ लागला आहे.
शिर्डी होणार जिल्हा मुख्यालय?
खरंतर जिल्ह्याचे मुख्यालय करण्यासाठी कार्यालयांसाठी मोठी जागा आवश्यक असते. दरम्यान काही दिवसांपूर्वीच शिर्डी येथील शेती महामंडळाची जमीन अन्य कारणांसाठी वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे नगर जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेले पशुवैद्यकीय महाविद्यालय देखील शिर्डी जवळच तयार केले जाणार आहे.
तसेच शिर्डी शहराच्या विकासासाठी 52 कोटी रुपयांचा विकास आराखडा देखील आखण्यात आला आहे. तसेच आता अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डीत सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे ही सर्व कामे शिर्डीला नवीन मुख्यालय बनवण्यासाठी केली जात असल्याचा दावा केला जात आहे. सरकारने घेतलेल्या या नवीन निर्णयामुळे आता असे सांगितले जात आहे की, राधाकृष्ण विखे पाटील आग्रही राहून उत्तरेकडचा नवीन जिल्हा तयार करून घेतील.
तसेच काही वर्षात शिर्डी लोकसभा मतदारसंघ देखील खुला होईल अशा परिस्थितीत तोवर या मतदारसंघावर दावा मजबूत करून ठेवण्यासाठी विखे पाटलांची ही तयारी असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे जिल्हा विभाजनाच्या या चर्चा सुरू आहेत तर दुसरीकडे शिर्डीत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करून विभाजनाची भूक भागवण्याचा हा प्रयत्न असल्याचे मत अनेक लोकांच्या माध्यमातून व्यक्त केले जात आहे.
एकंदरीत गेल्या अनेक वर्षांपासून कायमच चर्चेत असलेला अहमदनगर जिल्हा विभाजनाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आणि शिर्डीत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याच्या निर्णयाने या मुद्द्याला आता फोडणीच देण्याचे काम केले आहे.