Banana Farming : केळी हे भारतात उत्पादित होणारे एक मुख्य फळ पीक आहे. आपल्या महाराष्ट्रातही केळी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. राज्यातील खानदेश विभाग केळी उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो.
खानदेश विभागातील जळगाव जिल्हा हा केळीचे आगार म्हणून संपूर्ण जगात ख्यातनाम आहे. महाराष्ट्र व्यतिरिक्त राज्यातील उत्तर प्रदेश बिहार गुजरात तामिळनाडू या राज्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जात आहे.
दरम्यान देशातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे केळी पिकासाठी घातक ठरणारा एक विषाणूजन्य रोग भारतात दाखल झाला आहे.
यामुळे देशभरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, टीआर 1, टीआर 4 (फ्युसारियम विल्ट) या केळी पिकावर येणाऱ्या विषाणूजन्य रोगाचा भारतात शिरकाव झाला आहे.
हा रोग चीनमधून नेपाळ मार्गे भारतात आला असल्याचे कृषी तज्ञांनी सांगितले आहे. सध्या हा रोग बिहार उत्तर प्रदेश तामिळनाडू आणि गुजरात मध्ये पाहायला मिळत आहेत. या रोगांमुळे तेथील केळीच्या बागा संकटात आल्या आहेत.
हा रोग एवढा भयंकर आहे की यामुळे केळी बागा थेट नष्ट होतात. विशेष म्हणजे या रोगाचे जवळपास मातीमध्ये तीस वर्षे अस्तित्व कायम राहते. यामुळे एकदा की या रोगाचा शिरकाव झाला की नंतर या रोगापासून केळीच्या बागा वाचवणे जवळपास अशक्य होऊन बसते.
हेच कारण आहे की नेपाळने या रोगाच्या पार्श्वभूमीवर तेथे हाय अलर्ट जारी केला आहे. भारतातून आयात होणाऱ्या केळींवर कडक लक्ष ठेवले जात आहे. नेपाळमध्ये भारतातून आयात होणारी केळी सीमेवरच थांबवली जात आहे आणि त्या ठिकाणीच केळीला क्वारंटाईन केले जात आहे.
तर दुसरीकडे भारतातील चार राज्यांमध्ये या रोगाचा शिरकाव झालेला असतानाही कृषी विभाग गाढ झोपेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या रोगाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी कृषी विभागाकडून कोणत्याच हालचाली होत नसल्याचे चित्र डोळ्यास नजरे पडत आहे.
या विषाणूचा एकदा संसर्ग झाला की त्या परिसरातून केळीच्या बागाच नष्ट होऊन जातात. यामुळे जगात सर्वात घातक विषाणूजन्य रोग म्हणून याची ओळख आहे. या विषाणूजन्य रोगाचा संसर्ग संसर्गजन्य भागातून येणाऱ्या वाहनांमधून, वाहनाच्या चाकाला लागलेल्या मातीमधून, मजुरांच्या बुटाला लागलेल्या मातीमधून होत असतो अशी माहिती कृषी तज्ज्ञांनी दिली आहे.
म्हणजेच हा विषाणूजन्य रोग मातीमधूनच पसरतो. दरम्यान नेपाळमध्ये या रोगाच्या पार्श्वभूमीवर सीमेवर क्वारंटाईन सेंटर तयार करण्यात आले आहे. नेपाळमध्ये आयात होणाऱ्या केळीचे त्या ठिकाणी संपूर्ण चाचण्या केल्या जात आहेत.
शिवाय वाहनांचे निर्जंतुकीकरण केले जात आहे आणि यानंतरच मग वाहनाला परवानगी दिली जात आहे. एकंदरीत नेपाळमध्ये या संकटाला राष्ट्रीय आपदा म्हणून पाहिले जात आहे. पण भारतात तसे होत नसल्याचे पाहायला मिळाले आहे.
या रोगाकडे कृषी विभाग अजूनही गांभीर्याने पाहत नसल्याने या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुजरात आणि तामिळनाडू मध्ये फ्युसारियम विल्ट रोगाचा टीआर एक तसेच उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यात टीआर 4 या विषाणूचा शिरकाव झाल्याचे आढळून आले आहे.
दरम्यान केळीचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यातून उत्तर प्रदेश बिहारसह उत्तरेकडील राज्यांमध्ये दररोज केळी वाहतूक करणारी 500 हून अधिक वाहने जात आहेत. यामुळे जळगाव जिल्ह्यातही या रोगाचा शिरकाव होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये.
यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी शासनाने आणि प्रशासनाने घेणे आवश्यक आहे. दरम्यान या रोगाचा शिरकाव होऊ नये यासाठी निर्जंतुकीकरण हाच एकमेव पर्याय असल्याचे कृषी तज्ञांनी सांगितले आहे.