Banking News : आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडिया ही भारत सरकारने स्थापन केलेली एक मध्यवर्ती बँक आणि देशातील बँकिंग नियामक संस्था आहे. या संस्थेची स्थापना 1935 मध्ये करण्यात आली आहे. तेव्हापासून रिझर्व बँक ऑफ इंडिया देशातील सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांवर नियमन करत आहे.
देशातील सर्वच बँकांना रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या नियमांच्या अधीन राहून काम करावे लागते. जर देशातील बँकांनी आरबीआयचे नियमांचे उल्लंघन केले तर आरबीआय अशा बँकांवर कारवाई करते.
अनेकदा आरबीआयच्या माध्यमातून अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांवर दंडात्मक कारवाई केली जाते तर काही प्रसंगी बँकांचे लायसन्स अर्थातच परवाना देखील रद्द केला जातो. गेल्या काही महिन्यांचा विचार केला असता RBI ने देशातील अनेक महत्त्वाच्या बँकांना लाखो, करोडो रुपयांचा दंड ठोठावला आहे.
तर काही बँकांचे लायसन्स देखील रद्द करण्यात आले आहे. यामुळे बँक ग्राहकांमध्ये मोठे भितीचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच आरबीआयने देशातील आणखी एका नामांकित बँकेवर दंडात्मक कारवाई केली आहे. खाजगी क्षेत्रातील ॲक्सिस बँक या नामांकित बँकेवर आरबीआय ने कारवाई केली आहे.
या अंतर्गत ॲक्सिस बँकेवर 90 लाखांपेक्षा अधिकची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामुळे ॲक्सिस बँकेच्या ग्राहकांमध्ये थोडीशी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. बँक ग्राहकांना आरबीआयच्या या कारवाईमुळे त्यांच्यावर काही विपरीत परिणाम होणार का याबाबत चिंता सतावत आहे.
दरम्यान आरबीआयने ॲक्सिस बँक वर केलेल्या दंडात्मक कारवाईची सविस्तर माहिती दिली आहे. आरबीआय ने ॲक्सिस बँकेवर दंडात्मक कारवाई करण्याचे कारण काय आहे आणि यामुळे बँक ग्राहकांवर काय परिणाम होणार याबाबत सविस्तर अशी अपडेट दिली आहे.
RBI काय म्हणतंय?
भारतीय रिझर्व बँक ने याबाबत एक प्रेस नोट जारी केली आहे. 2 नोव्हेंबरला ही प्रेस नोट जारी करण्यात आली आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, खाजगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
सदर बँकेने बँकांसाठी जारी करण्यात आलेले विहित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यामुळे कारवाई करण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या कारवाई अंतर्गत आरबीआयने बँकेला 90.93 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. बँकेने केवायसी बाबत असलेले मार्गदर्शक तत्त्वे 2016 चे पालन करण्यात निष्काळजीपणा केल्यामुळे ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
ग्राहकांवर काय परिणाम होणार
दरम्यान आरबीआय ने ॲक्सिस बँक वर केलेल्या या दंडात्मक कारवाईचा बँकेतील ग्राहकांवर कोणताच विपरीत परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
त्यामुळे बँक ग्राहकांनी या कारवाईमुळे घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही असे सांगितले जात आहे. एकंदरीत बँकेने केवायसी नियमांचे अनुपालन न केल्यामुळे हे कारवाई करण्यात आले असून यामुळे ॲक्सिस बँकेच्या ग्राहकांवर काहीही परिणाम होणार नाहीये.