Cotton Price Maharashtra : तुम्ही कपाशीची लागवड केली आहे का ? हो, मग तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी दिलासादायक अशी बातमी समोर आली आहे. सध्याचा कापूस हंगाम हा गेल्यावर्षी विजयादशमीपासून सुरू झाला. पण, विजयादशमीपासून सुरू झालेला कापसाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी मोठा त्रासदायक ठरला आहे. याचे कारण म्हणजे हंगामाच्या सुरुवातीपासूनच कापसाला चांगला भाव मिळालेला नाही.
एकतर खरीप हंगामात झालेल्या कमी पावसामुळे आणि हवामान बदलामुळे कपाशीच्या पिकावर विविध रोगांचा आणि कीटकांचा प्रादुर्भाव पाहायला मिळाला. यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. दुसरीकडे, हंगामाच्या सुरुवातीपासूनच बाजारभाव दबावात होते.
सुरवातीच्या टप्प्यात कापसाला सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळत होता. नंतर मात्र बाजारभावात मोठी घसरण आली आणि बाजार भाव हमीभावापेक्षा खाली गेलेत. पण, आता हंगाम अंतिम टप्प्यात आला असतानाच बाजारभावात पुन्हा एकदा झळाळी पाहायला मिळाली आहे.
राज्यातील अनेक बाजारांमध्ये बाजारभावात मोठी सुधारणा झाली असून यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सध्या कापूस शिल्लक असेल त्यांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात का होईना पण कापसाचे भाव हमीभावापेक्षा अधिक झाले आहेत.
राज्यातील काही बाजारात कापसाला आठ हजार रुपये प्रति क्विंटलचा सरासरी दर मिळू लागला आहे. मात्र शेतकऱ्यांनी बाजारभावात आणखी वाढ झाली पाहिजे अशी आशा व्यक्त केली आहे. पिक उत्पादनात आलेली घट पाहता सध्याचा बाजार भाव देखील पुरेसा नसल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
दुसरीकडे राज्यातील काही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांकडील कापूस विकल्यानंतर बाजारभावात वाढ झाली असल्याने याचा फायदा शेतकऱ्यांना कसा होणार हा सवाल उपस्थित केला आहे.
या भाव वाढीचा फायदा फक्त व्यापाऱ्यांनाच होईल असा कटाक्ष शेतकऱ्यांनी केला असून सरकारच्या धोरणामुळेच शेतकऱ्यांचे मरण होत असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांच्या माध्यमातून केला जात आहे.
दुसरीकडे आता काही जाणकार लोकांनी आगामी काळात कापसाचा शॉर्टेज निर्माण होण्याची शक्यता असून यामुळे भावात वाढ होऊ शकते अशी आशा व्यक्त केलीय.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन प्राप्त झालेल्या माहितीनुसार, राज्यातील अकोला बाजार समितीत चांगल्या कापसाला सरासरी 8094 रुपये प्रतिक्विंट असा भाव मिळाला आहे.
चिमूर मंडईत कापसाला सरासरी 7651 रुपयांचा दर मिळाला आहे. अमरावती बाजार समितीत 7275 रुपयांचा दर मिळाला आहे. मानवत बाजार समितीत कापसाला सरासरी 7900 प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे. उमरेड बाजार समितीत कापसाला 7450 रुपये प्रतिक्विंटलला दर मिळाला आहे.