Farmer Success Story : अलीकडे शेतीचा व्यवसाय हा मोठा आव्हानात्मक बनला आहे. शेतकऱ्यांना शेतीच्या व्यवसायातून अपेक्षित अशी कमाई करता येत नाहीये. यामुळे अनेक शेतकरी पुत्रांनी आता शेती ऐवजी नोकरी आणि उद्योगधंद्यांना विशेष प्राधान्य दिले आहे. तथापि असेही अनेक शेतकरी पुत्र आहेत जे की शेतीचा व्यवसाय करत आहेत आणि शेतीमधून त्यांना चांगली कमाई देखील होत आहे.
नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील भोसे या गावातील नंदकिशोर गायकवाड या सुशिक्षित युवा तरुणाने शेतीमध्ये चमत्कार घडवून आणला आहे. खरे तर नंदकिशोर यांनी काही काळ स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. त्यांनी जवळपास चार ते पाच वर्षे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला.
गायकवाड हे पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते. परंतु कोरोना काळात तेथे निभाव लागणे म्हणजे अशक्य होते. यामुळे त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास थांबवला. ते पुन्हा गावाकडे परतले आणि शेती करू लागले. वडिलोपार्जित डोंगराळ जमिनीत त्यांनी शेती करण्याला सुरुवात केली.
सुरुवातीला दोन एकर जमिनीत ऊस लागवड केली यातून त्यांना चांगले उत्पादन मिळाले. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी पुढे वेगवेगळ्या फळांची लागवड केली.
मग काय त्यांनी अंबा, जांभूळ, पेरू, फणस यासह जापान आणि थायलंडचा अंबा, उन्हाळ्यात येणारे सफरचंद, जापान, मलेशियातील पेरू, काळे आणि पांढऱ्या रंगाची जांभळं, फणस, मसाल्यासाठीचे दालचिनी, इलायची, लवंग इत्यादी पिकांची लागवड केली.
विशेष म्हणजे त्यांना यातूनही चांगले उत्पादन आणि उत्पन्न मिळत आहे. विशेष म्हणजे ते फक्त फळ विक्रीचं करत आहेत असेच नाही तर रोप विक्रीतूनही त्यांना चांगला नफा मिळत आहे. फळ विक्री आणि रोप विक्रीतून त्यांना वर्षाकाठी 35 लाख रुपयांची कमाई होत आहे.
त्यातून खर्च वजा जाता गायकवाड यांना 25 लाख रुपये नेट प्रॉफिट मिळतं आहे. त्यामुळे सध्या गायकवाड यांची पंचक्रोशीत चर्चा असून त्यांच्या या चमकदार कामगिरीची नवयुवकांना भुरळ पडली आहे.
जर काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल केला आणि पारंपारिक पिकांऐवजी नगदी तसेच फळपिकांची लागवड केली तर शेतीचा व्यवसाय हा फायदेशीर ठरू शकतो हेच या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.