Farmer Success Story : शेती व्यवसाय अलीकडे मोठा आव्हानात्मक बनला आहे. शेतीमध्ये वेगवेगळ्या अडचणी शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहेत. एक ना अनेक संकटांमुळे हा व्यवसाय तोट्यात चालला आहे. आसमानी तसेच सुलतानी संकटांमुळे शेतकरी भरडला जात आहे. त्यांना शेतीमधून अपेक्षित अशी कमाई होत नाहीये. मात्र तरीही शेतकरी जिद्दीने शेती फुलवत आहेत.
विविध प्रयोग करत शेतकरी बांधव संकटावर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत. काळ्या आईशी इमान ठेवत शेतीमध्ये झगडत आहेत. विशेष म्हणजे वेगवेगळ्या संकटांचा आणि आव्हानांचा सामना करत राज्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक प्रयोगाच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना दिशा दाखवण्याचे काम केले आहे.
दरम्यान जालना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने असाच एक आधुनिक प्रयोग केला आहे. या शेतकऱ्याने खजूर लागवडीचा नवखा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. जालना अर्थातच मराठवाडा म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यापुढे उभे राहते ती सततची नापीकी अन दुष्काळ. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तसेच सर्वसामान्यांना पाण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागतात.
मराठवाड्यातील अनेक भागात पिण्यासाठी देखील पाणी राहत नाही. यामुळे साहजिकच मराठवाड्यातील शेतकऱ्यांना शेतीतून अपेक्षित अशी कमाई होत नाही. पण मात्र दुष्काळावर मात करत जालना जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने खजूर लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. खजूर हे प्रामुख्याने इराण आणि सौदी अरेबिया सारख्या आखाती देशात उत्पादित होते.
आपल्या देशातही अलीकडे खजूर लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. देशातील गुजरात आणि राजस्थान राज्यात थोड्याफार प्रमाणात खजुराची लागवड केली जाते. राज्यात मात्र खजूर लागवडीचा प्रयोग काही मोजक्याच शेतकऱ्यांनी केला आहे. या मोजक्या शेतकऱ्यांमध्ये जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तने वाडी येथील दामोदर शेंडगे यांचा देखील समावेश झाला आहे.
दामोदर यांनी आपल्या तीन एकर जमिनीवर खजूर लागवडीचा प्रयोग केला असून हा प्रयोग यशस्वी झाला आहे. दामोदर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी 2019 मध्ये खजूर लागवड केली. खजुराचे रोप त्यांनी इराणमधून मागवले. त्यावेळी 3250 प्रति नग प्रमाणे खजुराचे रोप खरेदी केले. 2019 ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी 25 बाय 25 या अंतरावर तीन एकर जमिनीवर दोनशे रोपांची त्यांनी लागवड केली.
विशेष म्हणजे खजूरच्या पिकाला त्यांनी शेणखत व्यतिरिक्त कोणतेच खत दिलेले नाही. वर्षातून फक्त दोनदा शेणखताची मात्रा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे लागवड केल्यानंतर तीन वर्षांच्या काळात या खजूर पिकाला चांगली फळधारणा झाली आणि जून 2023 मध्ये खजूर पिकावरील फळे विक्रीसाठी तयार झाली. सुयोग्य नियोजन केल्यामुळे त्यांना या खजूर पिकातून पहिल्या बहारातच प्रति झाड 50 ते 100 किलो पर्यंतचे उत्पादन मिळाले आहे.
दरम्यान उत्पादित झालेले खजूर त्यांनी बाजारात व्यापाऱ्यांना विक्री करण्याऐवजी त्यांच्या शेतातूनच याची विक्री केली आहे. त्यांचे शेत रस्त्याशेजारी असल्याने रस्त्याला स्टॉल लावून त्यांनी खजुराची विक्री केली. या विक्रीतून त्यांना आत्तापर्यंत आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तीन एकर खजूर पिकातून त्यांना जवळपास चार ते साडेचार टन माल मिळाला आणि दोनशे रुपये प्रति किलो प्रमाणे याची विक्री त्यांनी केली.
शेंडगे यांनी सांगितल्याप्रमाणे, खजूर झाडांना तुरे आल्यानंतर त्याचे पोलन करावे लागते. यासाठी प्रत्येक 20 झाडामागे 1 नर जातीचे झाड लावले जाते. दरम्यान झाडांना तुरे लागल्यानंतर या नर झाडाचा एक तुरा काढून इतर मादी झाडांच्या तुऱ्यामध्ये ठेवावा लागतो. अशा पद्धतीने याचे पोलन केले जाते आणि मग तेव्हाच उत्तम प्रतीचे खजूर मिळतात.