Government Employee News : आजपासून महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात दिवाळीचा आनंददायी पर्व सुरू झाला आहे. 15 नोव्हेंबर पर्यंत यंदा दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे. दरम्यान या सणासुदीच्या काळात राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. खरतर दरवर्षी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य शासनाकडून दिवाळीचा बोनस दिला जातो.
दरवर्षी राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीचा सण आनंदात साजरा करता यावा यासाठी बोनस मिळत असतो. यावर्षी मात्र अजून राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर करण्यात आलेला नाही. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस केव्हा मिळणार हा सवाल उपस्थित केला जात आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, गेल्या वर्षी राज्य कर्मचाऱ्यांना बारा हजार पाचशे रुपये एवढा दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला होता. यावर्षी मात्र यामध्ये वाढ करण्याची मागणी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
यासाठी विविध कर्मचारी संघटना आणि शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. यंदा राज्य कर्मचाऱ्यांच्या बोनसमध्ये दुपटीने वाढ करावी अशी मागणी आहे. राज्य कर्मचाऱ्यांना यावर्षी 25 हजाराचा बोनस मिळाला पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत मात्र वर्तमान शिंदे सरकारने अजून कोणताच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आता राज्य शासन याबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पण राज्यातील काही निमशासकीय कर्मचाऱ्यांना Diwali Bonus जाहीर करण्यात आला आहे.
विशेष बाब अशी की, यावर्षी निम शासकीय कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आलेला हा बोनस राज्य कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिडको महामंडळ अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना यंदाच्या दिवाळीत दिवाळी बोनस म्हणून 50 हजार रुपये दिले जाणार आहेत.
म्हणजेच सिडको महामंडळाने राज्य कर्मचाऱ्यांपेक्षा तसेच राज्यातील महापालिका कर्मचाऱ्यांपेक्षा अधिकचा बोनस आपल्या कर्मचाऱ्यांना देऊ केला आहे. त्यामुळे महामंडळाच्या या निर्णयाचे संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले आहे.
यामुळे या संबंधित कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार असा आशावाद व्यक्त होत आहे. याशिवाय ठाणे महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना देखील यावर्षी 20 टक्के अधिक दिवाळी बोनस मिळाला आहे.
ठाणे महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना 21 हजार 500 रुपये एवढा बोनस मिळाला आहे. याशिवाय, महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या आशा सेविकांना यावर्षी सहा हजार रुपयाचा दिवाळी बोनस अर्थातच भाऊबीज जाहीर करण्यात आली आहे.
यासोबतच कल्याण डोंबिवली महापालिका अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना 18 हजार पाचशे रुपये एवढा बोनस जाहीर करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा दिवाळी बोनस दोन हजार रुपयांनी अधिक आहे. यामुळे कल्याण डोंबिवली अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी देखील महापालिका प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.